उरणमध्ये गावठी दारूचा धंदा तेजीत

| उरण | प्रतिनिधी |

पनवेल व उरण तालुक्यातील साई व दिघाटी, केळवणे, चिरनेर, आवरे, वशेणीसह इतर गावात गावठी दारू पुरविणाऱ्यांचा धंदा तेजीत सुरू आहे. त्यात उरण तालुक्यातील चिरनेरसह इतर सर्वच गावांमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या कृपाशीर्वादाने गावठी दारूची राजरोसपणे विक्री केली जात आहे. त्यामुळे याठिकाणी देखील पिंपरी-चिंचवड येथील दारुच्या घटनेची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही, अशा प्रकारची चर्चा सध्या जनमानसात सुरू झाली आहे.

गावठी दारूमुळे तरुणांसह महिला व्यसनाधिन होऊन गावातील लोकांना खूप त्रास देत असतात. तसेच, या गावठी दारूमुळे अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त होत आहेत. तर, अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. उरण तालुक्यातील चिरनेरसह इतर अनेक गावात हातभट्टी दारुची विक्री केली जाते. त्यामुळे येथील आदिवासी समाजाची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. यासंदर्भात सर्व सामन्य जनतेकडून पोलीसांकडे व उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली जात; परंतु, उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलीस यंत्रणा या घटनेकडे दुर्लक्ष करते. दरम्यान, पिंपरी-चिंचवड येथील दारु कांडची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलीस यंत्रणेने नुकताच चाणजे येथील हातभट्टीवर कारवाईचा बडगा उगारुन हातभट्टी उद्ध्वस्त केली. त्याचे जनतेतून कौतुक होत असताना इतर गावांतील मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या हातभट्टीवर उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांचे जाणूनबुजुन दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या परिसरातील एकाच गावावर कारवाई का? इतर गावांवर पोलीस मेहेरबान आहेत का? या गावांमध्ये कारवाई कधी होईल, असे प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून विचारले जात आहे.

Exit mobile version