गावठी भाज्यांना ग्राहकांची पसंती

| उरण | वार्ताहर |

भातशेती सरल्यानंतर उरण परिसरात गावठी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये मेथी, मुळा, पालक, माठ या या भाज्यांचा समावेश असतो. सध्या दवावर पिकणाऱ्या या भाज्यांची बाजारात मोठी मागणी असून, परिसरातील नागरिक गावठी भाज्यांना पहिली पसंती देत आहेत.

उरण शहरातील बाजारात आणि कोप्रोली नाका, चिरनेर नाका, दिघोडे नाका येथे दवावर पिकलेल्या गावठी भाज्यांची आवक वाढली आहे. सकाळच्या वेळी उरण परिसरातील ग्रामीण भागातील महिला मेथी, पालक, मुळा, माठ, चवळी, भाज्यांचे देठ, शेवग्याचा पाला या पालेभाजी आणि मळ्यात पिकवलेले शिराळे, घोसाळे, पडवळ, काकडी, दुधी, भोपळा, कारली आदी भाज्या विक्रीस आणत आहेत. सध्या दवांवर पिकणाऱ्या या भाज्यांना चांगली मागणी आहे. उरण परिसरातील ग्रामीण भागात हिवाळ्यात भाजीपाला उत्पादन घेतले जाते. सकाळच्या वेळी उरण शहर आणि कोप्रोली नाका बाजारात ही भाजी विक्रीला येते. तसेच घरोघरी फिरूनही महिला भाजी विक्री करतात. या ताज्या भाजीला मोठी मागणी असल्याने या भाज्यांच्या माध्यमातून चांगलेच आर्थिक उत्पन्न मिळत आहे. जुडी छोटी असली, तरी नागरिक त्यांनाच पसंती देत आहेत.

उत्पन्नात भर
उरण तालुक्यात थंडीची चाहूल सुरू झाली आहे. थंडी आणि पहाटेच्यावेळी धुके पडत असल्याने रात्रीच्या वेळी दवाचे प्रमाण वाढत आहे. या दवांवर पालेभाज्या आणि वाल यांचे उत्पन्न खूप चांगल्या प्रमाणात येते. पाण्यापेक्षा दवांवर पिकलेल्या भाज्यांची चव अधिक असते. त्यामुळे नागरिक दवांवर पिकलेल्या भाज्यांना पसंती देत आहेत.
Exit mobile version