वसुधा सोसायटीने पुन्हा उभारली मुख्य कमान
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बहुचर्चित असलेल्या वसुधा सामाजिक वनीकरण सोसायटीने विडसई ग्रामस्थांच्या येण्या-जाण्याच्या मुख्य मार्गावर कमान बांधली आहे, शिवाय या सोसायटीत अनधिकृतपणे बांधकामे होत असल्याचा आरोप विडसई ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे व अन्य ग्रामस्थांनी केला आहे.
वसुधा सोसायटीच्या या मनमानी कारभाराविरोधात विडसई ग्रामस्थ आक्रमक झाले असून, या मार्गावर बांधण्यात आलेली कमान तात्काळ हटविण्यात यावी, तसेच या सोसायटीत होत असलेल्या सर्व बांधकामाची चौकशी करून अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी निवेदनकर्ते ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ही समाधानकारक कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याचे सांगत ग्रामस्थ संतप्त झाले असून, विडसई ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे यांनी पाली तहसिल कार्यालयासोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील तक्रारी निवेदन सुधागड पाली तहसीलदार उत्तम कुंभार यांना देण्यात आले आहे. निवेदनाची प्रत माहितीकरिता जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड, उपविभागीय अधिकारी रायगड, पोलीस निरीक्षक पाली सुधागड यांना देण्यात आलेल्या आहेत.
जोपर्यंत सदरची कमान हटवली जात नाही व येथे होत असलेल्या बांधकामाची चौकशी केली जाऊन योग्य ती कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील व आंदोलन दिवसेंदिवस उग्र केले जाईल, त्यानंतर होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असल्याचा इशारा आंदोलनकर्ते सचिन वाघमारे व ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनाला स्थानिकांचा पाठिंबा मिळत असल्याने प्रशासन व वसुधा सोसायटी पुढं काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.