श्रमदानातून उभारला तात्पुरता रस्ता

आरकसवाडी, पिरकडवाडी आणि उंबरणेवाडीतील नागरिकांचा पुढाकार

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील आणि माथेरानच्या पायथ्याशी सानिध्यात वसलेली आरकसवाडी, पिरकडवाडी आणि उंबरणेवाडी या दुर्गम वाड्यांतील रस्त्याच्या प्रश्नाकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. अखेर श्रमदानाच्या माध्यमातून तात्पुरता स्वरूपाचा रस्ता तयार करण्याचा निर्णय आरकसवाडी, पिरकडवाडी आणि उंबरणेवाडीतील ग्रामस्थांनी घेतला.

पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ये-जा करणे अत्यंत धोकादायक झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत दगड, माती टाकून खड्डे भरत तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार केला. या श्रमदान मोहिमेत तिन्ही वाड्यांतील शेकडो ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महिलांसह युवकांनीही मोठ्या प्रमाणावर श्रमदान करून रस्ता वाहतुकीयोग्य करण्यासाठी मेहनत घेतली.

काही दिवसांपूर्वी या भागातील एका गरोदर महिलेला रस्त्याअभावी कापडी झोळीतून उचलून दवाखान्यात नेण्याची वेळ आली होती. त्यानंतर प्रसूती होऊन मुलगा जन्माला आल्यानंतर चार ते पाच दिवसांनी नवजात बाळ आणि मातेलाही झोळीतूनच घरी आणावे लागले होते. या घटनेमुळे परिसरातील दळणवळणाच्या समस्येचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले होते.

ग्रामस्थांनी अनेकदा शासन आणि प्रशासनाकडे रस्त्याच्या कामासाठी मागणी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अखेर स्वतःच श्रमदानातून तात्पुरता रस्ता उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

या उपक्रमाचे नियोजन प्रदीप उघडा, बबन वीर, राजू उघडा, अनंता पारधी यांच्यासह अनेक युवकांनी या कामात पुढाकार घेत महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामस्थांच्या या एकजुटीचे सर्वत्र कौतुक होत असून प्रशासनाने आता कायमस्वरूपी दर्जेदार रस्ता उभारण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Exit mobile version