ग्रामस्थांनो, पालिकेचा प्रारुप विकास आराखडा पाहायचाय… तर आईफोन वापरा

नगररचना विभागाच्या अधिकारी कवाडेंंची अजब सूचना


| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

महापालिकेचा सुधारित व एकत्रित प्रारुप विकास आराखडा पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. या आराखड्यावर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारा आराखडा असल्याचा गाजावाजा करत जाहीर करण्यात आलेला हा आराखडा फक्त इंग्रजी भाषेत जाहीर करण्यात आला असून, आरक्षणाचे नकाशे फक्त आय फोनवरच स्पष्टपणे पाहता येतील, असे वक्तव्य नगररचना विभागाच्या अधिकारी ज्योती कवाडे यांनी करून एका प्रकारे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची खिल्ली उडवली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

पनवेल पालिकेचा सुधारित व एकत्रित प्रारुप विकास आराखडा पालिका प्रशासनाने गतिमान पद्धतीने विक्रमी पाच वर्षांत तयार केला असून, पुढील 30 दिवसांत नागरिकांना या आराखड्यावर हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. त्यानंतर हा आराखडा शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. या आराखड्यामुळे पनवेलच्या ग्रामीण भागाला विकासाची चालना मिळणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पालिकेकडून सादर करण्यात आलेला आराखडा पालिकेच्या अधिकृत संकेत स्थळावर टाकण्यात आला आहे. मात्र, संकेत स्थळावर टाकण्यात आलेला आराखडा फक्त इंग्रजी भाषेत टाकण्यात आला असून, आराखडा स्पष्टपणे पाहण्यासाठी पाहणार्‍याकडे आयफोन असणे गरजेचे असल्याची माहिती नगररचना विभागाच्या अधिकारी कवाडे यांनी दिली आहे. अँड्रॉइड फोनवर हा आराखडा स्पष्टपणे पाहता येत नसल्याने आणखी माहिती हवी असल्यास पालिका कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सांगून कवाडे यांनी माहिती देण्याचे टाळल्याने पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी संपर्क साधला असता तांत्रिक अडचणीमुळे विकास आराखडा इंग्रजीत असल्याची माहिती देत तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आयुक्त चितळे यांनी दिली आहे.

शेतकर्‍यांची अडचण
पालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या विकास आराखड्यावर हरकती आणि सूचना करण्यासाठी पालिकेतर्फे 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र, हा आराखडा इंग्रजी भाषेत असल्याने तसेच फक्त आयफोनवरच स्पष्टपणे दिसत असल्याने आयफोन वापरत नसलेल्या आणि इंग्रजी भाषा समजत नसलेल्या ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची अडचण होणार आहे.

काही तांत्रिक बाबींमुळे आराखडा इंग्रजी भाषेत आहे. तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करणार आहे.

मंगेश चितळे,
आयुक्त, पनवेल महापालिका

पालिकेचा जाहीर करण्यात आलेला विकास आराखडा अँड्रॉइड फोनवर पाहण्यासाठी अडचण येत आहे. मात्र, आयफोन वापरणार्‍यांना आराखडा सहज पाहता येईल.

ज्योती कवाडे,
अधिकारी, नगररचना विभाग

सर्वसामान्य पनवेलकरांना आयफोन वापरणे शक्य नाही. त्याचप्रमाणे सामान्य शेतकर्‍यांना इंग्रजी समजतेच असं नाही. त्यामुळे सर्वसामान्य पनवेलकरांना समजेल अशा भाषेत आराखडा सादर केल्यानंतरच हरकत आणि सूचना करण्याची मुदत द्यावी, अशी मागणी आयुक्तांकडे करणार आहे.

बाळाराम पाटील,
माजी आमदार

Exit mobile version