पाईपलाईन फुटूनही दुरुस्तीला विलंब; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील बेलकडे गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका थेट ग्रामस्थांना बसत आहे. खोदकामादरम्यान पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटूनही ती तातडीने दुरुस्त करण्यात आलेली नसल्याने गेल्या जवळपास महिनाभरापासून बेलकडे ग्रामस्थ पाण्यावाचून त्रस्त झाले आहेत. एमएसआयडीसीमार्फत सुरू असलेल्या या कामात ठेकेदाराकडून पाईपलाईन दुरुस्तीची केवळ टोलवाटोलवी होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
अलिबाग-रोहा तसेच अलिबाग-मुरुड या मार्गांच्या रुंदीकरणासह गटारांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू आहे. या कामासाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले असून, त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन हालचालींनाही अडथळे निर्माण होत आहेत. तरीही विकासकामांना विरोध न करता नागरिक संयम बाळगत होते. मात्र, विकासाच्या नावाखाली मूलभूत सुविधांवरच गदा येत असल्याचा आरोप आता ग्रामस्थांकडून केला जात आहे.
बेलकडे गावाच्या हद्दीत गटारासाठी करण्यात आलेल्या खोदकामादरम्यान सुमारे 30 दिवसांपूर्वी पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली. त्यामुळे परिसरातील सुमारे तीस ते चाळीस कुटुंबांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद पडला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना दररोज वणवण भटकावे लागत असून, घरातील दैनंदिन कामेही ठप्प झाली आहेत. विशेषतः वृद्ध नागरिकांना पाण्यासाठी बाहेर भटकंती करणे कठीण होत असल्याने त्यांचे हाल अधिकच वाढले आहेत.
ग्रामस्थांनी वारंवार संबंधित ठेकेदाराकडे तक्रारी केल्या असतानाही दुरुस्तीचे काम होत नसल्याने नाराजी वाढत आहे. “आज करतो, उद्या करतो” अशी उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्यात आला नाही तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडतील, असा इशारा बेलकडे ग्रामस्थांनी दिला आहे.
आदेश दिले, पण काम कुठेय?
याप्रकरणी एमएसआयडीसीचे अभियंता बी.के. सिंग यांच्याशी दोन दिवसांपूर्वी संपर्क साधला असता त्यांनी ठेकेदाराला तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या घटनेला चार दिवस उलटूनही प्रत्यक्षात कोणतीही हालचाल झालेली नाही. अधिकारी आदेश देतात आणि ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्याचा ठेका रद्द करावा, अशी तीव्र मागणी बेलकडे ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
अजून किती दिवस पाण्यावाचून?
गेल्या अनेक दिवसांपासून गावात पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची अवस्था बिकट झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दररोज धावपळ करावी लागत असून, दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीवर संतप्त ग्रामस्थांनी “अजून किती दिवस वाट पाहायची?” असा सवाल उपस्थित केला आहे. तातडीने पाईपलाईन दुरुस्त न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शवली आहे.







