मरण पत्करु; पण काम बंदच ठेवण्याचा इशारा
। कणकवली । प्रतिनिधी ।
मेलो तरी चालेल, मुलाबाळांना घेऊन आम्ही नरडवे धरण प्रकल्पाला विरोध करणारच. पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाण्याची तयारी आहे. गोळीबार झाला तरी मरण पत्करू; पण जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत धरणाचे काम होऊ देणार नाही, असा इशारा नरडवे धरणग्रस्त कृती समितीच्यावतीने आज येथे देण्यात आला आहे.
येथील पंचायत समितीच्या पत्रकार कक्षामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये प्रकल्पग्रस्त कृती समितीचे सदस्य बोलत होते. यावेळी धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष गणेश ढवळ, कृती समितीचे उपाध्यक्ष नित्यानंद सावंत, शासकीय धरणग्रस्त समितीचे माजी सदस्य संतोष सावंत, समितीचे सचिव प्रभाकर ढवळ, माजी अध्यक्ष व्हिक्टर डिसोजा, प्रकाश सावंत, चंद्रकांत नार्वेकर, सल्लागार जयराम ढवळे आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना सांगण्यात आले की, प्रकल्पाचे काम गेले तीन महिने बंद होते; मात्र 4 एप्रिलला ठेकेदाराने हे काम सुरू केले. हे काम बंद करावे अशी सूचना आम्ही ठेकेदाराला केली.
त्यामुळे ठेकेदाराने काम बंद केले; मात्र प्रकल्प अधिकारी महादेव कदम यांनी सांगितले की, कार्यकारी संचालक यांच्या आदेशाने आम्ही काम सुरू करत आहोत. त्यामुळे आम्ही सांगितले की, तुम्हाला जर काम सुरू करायचे असेल तर नरडवे गावांमध्ये येऊन बैठक घ्या, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करा, त्यानंतर आम्ही प्रकल्पाचे काम सुरु करण्यास परवानगी देऊ असे सुचवले; मात्र प्रकल्प अधिकारी नरडवेमध्ये येण्यास नकार देत आहेत. अध्यक्ष गणेश ढवळ यांना कणकवली पोलिस ठाण्यातून फोन करण्यात आला.
कार्यकारी अभियंता यांच्या म्हणण्यानुसार तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या असताना तुम्ही काम बंद का करता? आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितले. जोपर्यंत धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत आम्ही काम होऊ देणार नाही. या प्रकल्पातून जाणारा मोहम्मदवाडी, घोलणवाडी, दुर्गानगर येथे जाणारा मुख्य रस्ता बंद करण्याचा घाट सध्या सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आम्हाला 11 किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे. आमची मुले शाळेत कशी जाणार? म्हणून हा त्यांचा प्रयत्न आम्ही हाणून पडलेला आहे.
पोलीस बळाचा वापर करून ठेकेदार आम्हाला त्रास देत आहे. आम्ही मेलो तरी चालेल, मुलाबाळांना घेऊन आम्ही प्रकल्पाला विरोध करणारच. पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाण्याची आमची तयारी आहे. गोळीबार झाला तरी आम्ही मरण पत्करू; पण धरणाचे काम जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत होऊ देणार नाही.
धरणग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 23 जानेवारी 2022 ला आम्ही जिल्हाधिकार्यांपासून तहसीलदारापर्यंत सर्वांना निवेदन दिले होते. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत काम बंद करावे असे आम्ही निवेदनातून स्पष्ट केले होते; मात्र ठेकेदाराने पुन्हा एकदा धरणाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला.
48 गावांना लाभ
या प्रकल्पतून 8084 हेक्टर सिंचन निर्मिती होणार आहे. तीन तालुक्यातील 48 गावांमध्ये लाभक्षेत्र आहे. या लाभक्षेत्रातील 478 हेक्टर जमीन आरक्षित ठेवली आहे; मात्र हे आरक्षण अद्याप उठवलेले नाही. प्रकल्पग्रस्तांना जमिनी देण्यात आलेल्या नाहीत. आम्हाला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले जात नसेल तर आम्ही धरणाचे काम कसे करू देणार असा सवालही कृती समितीच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.






