फोगाटची पदक विजेत्यांना धोबीपछाड

तीन ऑलिम्पिक खेळणारी पहिली कुस्तीपटू

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेतीला पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर युक्रेनच्या ओक्साना लिव्हाचचे आव्हान होते आणि विनेशने ही लढत 7-5 अशी जिंकून उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला. सलग तीन ऑलिम्पिक खेळणारी विनेश ही भारताची पहिली महिला कुस्तीपटू आहे.

विनेश फोगटने पहिल्याच सामन्यात ज्याप्रकारे ऑलिम्पिक विजेतीला पराभूत केले, ते पाहता ओक्सानाला कडवी टक्कर द्यावी लागेल हे निश्‍चित होते. ओक्सानाने हातावर लोशन लावल्याचा आरोप विनेशने सुरुवातीलाच केला. दोन्ही खेळाडू एकमेकींच्या ताकद आजमावत होत्या. विनेशेने दुसर्‍याच मिनिटाला युक्रेनच्या खेळाडूला टेक डाऊन करून 2 गुण कमावले. दुसर्‍या फेरीत पुन्हा एकदा विनेशने टेक डाऊन करत ओक्सानाला मॅटवर लोळवले आणि आणखी दोन गुण घेत आघाडी 4-0 अशी मजबूत केली. दीड मिनिट असताना ओक्सानाने 2 गुण घेतले. मात्र, विनेशने तिचाच डाव तिच्यावर उलटवला आणि एक गुण घेत आघाडी 5-2 अशी मजबूत ठेवली. शेवटच्या मिनिटाला ओक्साने 1 गुण घेत सामन्यातील आव्हान कायम राखले. शेवटच्या 50 सेकंदात ओक्सानाने पिछाडी 4-5 अशी कमी केली. ओक्सानाने सातत्याने आक्रमण केले आणि 14 सेकंद शिल्लक असताना विनेशने प्रतिस्पर्धीला मॅटवर आपटले आणि 7-4 अशी आघाडी घेतली. विनेशने हा सामना 7-5 अशी जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

तत्पुर्वी, विनेश फोगाटने पहिल्याच सामन्यात धक्कादायक निकाल नोंदवताना टोकियोतील सुवर्णपदक विजेती युई सुसाकीचे आव्हान मोडून काढले. तिच्यासमोर पहिल्याच फेरीत टोकियोतील सुवर्णपदक विजेती युई सुसाकीचे आव्हान होते. जपानच्या खेळाडूने 2-0 अशी आघाडी घेतली होती. परंतु, विनेशने उल्लेखनीय कामगिरी केली आणि ही मॅच 3-2 अशी जिंकून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली होती. युई सुसाकी ही चार वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे आणि दोन वेळा आशियाई चॅम्पियन ठरली आहे. अशा तगड्या खेळाडूला नमवून विनेशने पदकासाठी प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे.

Exit mobile version