ऑलिम्पिकमध्ये खेळणार असल्याचे जाहीर
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने 2024 मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकनंतर कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, आता तिने या निर्णयावरून यू-टर्न घेतला आहे. आपण निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर करत 2028 मध्ये होणाऱ्या ऑलंपिक स्पर्धेत आपण खेळणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश अंतिम फेरीत पोहोचली होती. मात्र, 50 किलो वजनी गटात खेळताना तिचं वजन 100 ग्रॅम जास्त निघालं होतं. त्यामुळे तिला अंतिम फेरीतून बाद करण्यात आलं होतं. या निर्णयानंतर ती मानसिकदृष्ट्या खचली होती. तसेच आपण कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आता तिने हा निर्णय मागे घेतला आहे. विनेश फोगाटने सोशल मीडियावर प्ोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. लोक सतत विचारत होते, पॅरिस ऑलिम्पिक माझी शेवटची स्पर्धा होती का? बराच काळ माझ्याकडे याचे उत्तर नव्हते. मला मॅटपासून, दबावापासून, अपेक्षांपासूनअगदी स्वतःच्या महत्त्वाकांक्षांपासूनही दूर जाण्याची गरज होती. अनेक वर्षांनी पहिल्यांदा मी स्वतःला शांतपणे श्वास घेऊ दिला. हृदय तुटणे, त्याग माझ्या त्या अनेक रूपांना जगाने कधी पाहिलंच नाही, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
