आमदारांकडून आचारसंहितेचा भंग

रायगडचे जिल्हाधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देतील का

| अलिबाग | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून वातावरण सध्या तापले आहे. येत्या 7 मे रोजी रायगडमध्ये मतदान पार पडणार आहे. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षाकडून मतदारांना प्रलोभने दाखविण्यास सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीत दोन विकासकामांचे भूमीपूजन शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. लोकसभा निवडणूक जाहिर झाल्यानंतर संपूर्ण देशात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या कालावधीत लोकप्रतिनिधींनी विकासकामांचे भूमीपूजन केल्यास आचारसंहितेचा भंग होतो. असे असतानाही आमदारांनी ऐन निवडणूकीच्या तोंडावर मतदारांना प्रलोभन दाखविण्याच्या उद्देशाने विकासकामांचे भुमीपूजन केले. त्यामुळे सत्ताधारी आमदारांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

रायगड लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वेगवेगळ्या समिती गठीत केल्या आहेत. या निवडणूकीत आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहेत. मतदारांना अमिष दाखविणाऱ्यांवर या पथकाद्वारे कारवाई केली जाते. मात्र, मंगळवारी सकाळी अलिबागमधील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीत विकासकामांचा भूमीपूजन सोहळा शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. याबाबत आचारसंहितेचे काम करणाऱ्या गटविकास अधिकारी दाजी ताईंगडे यांना विचारणा केली असता, एखादे प्रलंबित काम करीत असल्यास त्याला आचारसंहितेचे नियम लागू होत नाही. मात्र, कामाचे भूमीपूजन करणे म्हणजे आचारसंहितेचा भंग होतो. अशा प्रकारचे प्रकरण आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते, असे ते म्हणाले.

जिल्ह्यात आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये याबाबत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक मंडळी गाव पातळीवर एखादे कार्यक्रम घेतानादेखील विचार करीत आहेत. आचारसंहितेच्या भंगाची भिती सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रशासनाकडून निर्माण केली जाते. मात्र शिंदे गटातील आमदारांकडून आचारसंहितेचा भंग केला जात आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे. या प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांकडून नाराजीचे सुर उमटत आहेत.

निवडणूकीच्या कालावधीत एखाद्या कामाचे भूमीपूजन करणे आचारसंहितेचा भंग आहे. वेश्वी येथील भूमीपूजन कामांची माहिती घेऊन संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल.

दाजी ताईंगडे, गटविकास अधिकारी
नियमांना केराची टोपली
निवडणूक आयोगाच्या नियमानूसार सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही. याशिवाय शीलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत. असे असताना शिंदे गटाचे आ. दळवी यांनी आचारसंहितेच्या नियमांना केराची टोपली दाखवत बिनधास्तपणे विकासकामांचे भुमीपूजन केले. नियम सर्वांना सारखेच असले पाहिजेत. मात्र, तरी देखील शिंदे गटाच्या आमदाराकडून निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. यावर निवडणूक आयोग कारवाई करेल का, असा प्रश्न जनतेने उपस्थित केला आहे.
मतदारांची फसवणूक
निवडणूकीच्या तोंडावर आमदारांनी मतदारांना विकासकामांचे प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. भुमीपूजन सोहळे करुन आमदार नागरिकांची केवळ फसवणूक करीत आहेत.
Exit mobile version