। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड दौर्याप्रसंगी जिल्हा प्रशासनाकडून राजशिष्टाचाराचा भंग झाल्याची घटना घडली आहे. राजशिष्टाचारानुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांचा क्रम प्रथम असतानाही खासदार आणि आमदारांकडून सर्वप्रथम राष्ट्रपतींचे स्वागत करण्यात आले आहे. या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
किल्ले रायगड पाहणी दौर्यावर आलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे किल्ले रायगडावर आगमन झाले असता. त्यांचे सर्वप्रथम खासदार सुनील तटकरे त्यानंतर आमदार भरत गोगावले यांच्याकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. राजशिष्टाचारानुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या जिल्ह्याच्या प्रथम नागरिक आहेत. अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. त्यामुळे सर्वप्रथम राष्ट्रपतींचे स्वागत त्यांनी करणे अपेक्षित होते. मात्र जिल्हा प्रशासनाला याची आठवण झालेली दिसत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून राजशिष्टाचाराचा भंग झाल्याचे समोर आले आहे.
खासदार सुनील तटकरे हे जिल्ह्यातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी देखील जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांचा कन्या विद्यमान राजशिष्टाचार राज्यमंत्री पालकमंत्री अदिती तटकरे या देखील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. त्यामुळे हा राजशिष्टाचार त्यांना माहित असायला हवा. मात्र त्यांनाही याचा विसर पडला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्व अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना रायगडावर आले असता तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया पाटील यांनी जिल्ह्याच्या वतीने त्यांचे सर्वप्रथम स्वागत केले होते. ही बाब जिल्हा प्रशासनाने लक्षात घेऊन त्याप्रमाणे पालन करणे आवश्यक असताना तसे घडले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.