मेरीटाईमकडून सीआरझेडचे उल्लंघन

खोरा बंदर रस्त्यावर बेकायदेशीर कंपाऊंड वॉलचे बांधकाम
स्थानिक रहिवासी सुरेश शिंदे यांची वरिष्ठांकडे तक्रार

| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील एकदरा ग्रामपंचायत हद्दीतील खोरा बंदर या ठिकाणी असणार्‍या रस्त्याच्या गटाराच्या बाहेरच्या बाजूला सीआरझेडचे उल्लंघन करून बेकायदेशीर कंपाऊंड वॉल बांधण्याचे काम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या वतीने सुरू आहे. या बेकायदेशीर बांधकामाविरोधात खोरा बंदरजवळील रहिवासी असणारे अजय सुरेश शिंदे यांनी रितसर निवेदन देऊन सुरू असलेल्या बांधकाम बंद करावे, अशी मागणी यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड अधिकारी मुरुड व प्रादेशिक अलिबाग याठिकाणी केली आहे.

मेरीटाईम बोर्डाने जंजिरा किल्ल्यात जाणार्‍या पर्यटकांसाठी खास 400 वाहने पार्किंग होतील अशी एक कोटी खर्चून पार्किंग बनवली आहे. पार्किंग बनवून तीन वर्षे झाली, अजूनही उद्घाटन झाले नाही. जेटीपर्यंतचा रस्ता मोठा केला आहे. परंतु, मुख्य रस्त्यावरून जेटीकडे वळताना हार्बरचे कार्यालय आहे. कार्यालयाची भिंत रस्त्यात बांधल्याने रस्ता अरुंद झाला आहे. किल्ला पाहण्यासाठी मोठ्या बस पार्किंगकडे जाताना अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. भिंत बांधताना रस्ता रुंदीकरणाचा विचार होणे गरजेचे आहे. त्या रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे पाडून पर्यटकांसाठी रस्ता मोठा करण्याची मागणी अजय शिंदे यांनी केली आहे.

मेरीटाईम बोर्डाने हार्बर कार्यालयाच्या बांधकाम करताना रस्तयाकडील भिंत बांधताना मूळ भिंत सोडून 3 फूट बाहेर आणल्याने रस्ता अरुंद झाला. समोर घर असल्याने रस्त्याची लांबी 15 फूट असल्याने पर्यटकांच्या मोट्या बस पार्किंगकडे वळताना अडकण्याची शक्यता आहे. खरं तर, मुरुडला पर्यटन विकासासाठी खोरा बंदर महत्त्वाचे ठिकाण आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी जलवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. एकावेळी सलग सुटीत हजारो पर्यटक किल्ला पाहण्यासाठी येतात. त्यावेळी वाहतूक कोंडी होते. कार्यालयाच्या या भिंतीमुळे दोन वाहने सोबत जाऊच शकत नाही. पुढील पर्यटन विकासासाठी रस्त्याचे नियोजन आताच करणे योग्य होईल. त्यासाठी केलेले बांधकाम पाठीमागे सरकवण्यात यावे व चालू असलेले काम बंद करण्यात यावे, अशी मागणी यांनी केली आहे.

कुठेही बेकायदेशीर काम चालू नाही. आमचे जुने ऑफिस होतं, ते पडीक झालं आहे आणि त्याचठिकाणी कंपाऊंड वॉलचं काम चालू आहे. आणि, शासकीय कामांकरिता सीआरझेड येत नाही. – समीर बारापत्रे, मेरीटाईम बोर्ड अधिकारी

Exit mobile version