| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायतमधील जमीन विकासकांकडून टोलेजंग इमारती आणि बांधकामे केली जात आहेत. मात्र, त्या ठिकाणी शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करण्यात येत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते उत्तम पालांडे यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षात कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठंमोठी गृह संकुल उभारली जात आहेत. ही गृह संकुले उभारताना स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन जमीन बिनशेती करून बांधण्यात आली आहेत. बिनशेती परवानगी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून दिली जात असताना गृह संकुलांचे काम केले जात आहे. मात्र, गृह संकुले उभारताना बिनशेती परवान्यातील अटी शर्तींना केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत असल्याचा आरोप होत आहे. येथे उभारण्यात आलेले बहुतांश गृहसंकुलाचे काम बिनशेती परवानामध्ये नमूद असणाऱ्या नियम व अटींचा उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते उत्तम पालांडे यांनी आवाज उठवला आहे.







