बांग्लादेशमध्ये हिंसाचार, 300 जणांचा मृत्यू; इंटरनेट बंद


| ढाका | वृत्तसंस्था |

बांगलादेशमध्ये अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली असून पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. आरक्षणासाठी लढ्यानंतर राजधानी ढाका इथे हिंसाचार उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत 300 हून अधिक जणांना आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे बांगलादेशातील परिस्थिती गंभीर झाली होती. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु झालेल्या आंदोलनाचे लोण देशभरात पसरत जाऊन टोकाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर आपण ही परिस्थिती हाताळू शकणार नाही, हे ध्यानात आल्यामुळे शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेख हसीना या भारतात आश्रयाला पोहोचल्या असून त्या त्रिपुरातील आगरताळ इथे उतरल्याची माहिती समजते. हसीना शेख यांचे हेलिकॉप्टर भारताच्या दिशेने आले आहे. त्यांच्यासोबत सोबत बहीण शेख रेहाना देखील आहे.

बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर तिथे बराच काळ लष्करी राजवट होती. पण त्यानंतर तिथे लोकशाही अस्तित्वात आली. गेल्या 20 वर्षांपासून बांगलादेशमध्ये हसीना यांचे सरकार आहे. सलग चौथ्यांदा त्या पंतप्रधान झाल्या आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. हसीना सरकारने आंदोलकांवर अत्याधिक बळाचा वापर केल्याचे आरोप करण्यात आले होते.

देशात इंटरनेट बंद
बांगलादेशमधील जनतेने लाँग मार्च टू ढाकामध्ये भाग घेण्याचे आवाहन केल्यानंतर सरकारने इंटरनेट बंद केले होते. त्याआधी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आंदोलक आणि सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांमध्ये झटापट होऊन या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
Exit mobile version