मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार

| बोरोबेकरा | वृत्तसंस्था |

मणिपूरमध्ये शनिवारी जिरीबाम जिल्ह्यातील एका गावावर अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यानंतर याठिकाणी हिंसाचार उसळला. यासंदर्भात एका अधिकार्‍याने सांगितले की, अतिरेक्यांनी पहाटे 5 वाजता बोरोबेकरा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या एका गावाला आधुनिक शस्त्रांनी लक्ष्य केले. अतिरेक्यांनी बॉम्बस्फोटही केले. यादरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलीस कर्मचार्‍यांनी प्रत्युत्तर दिले आणि दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. याचबरोबर, घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात येत असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, ही दिलासादायक बाब आहे. ज्यावेळी हा हिंसाचार उसळला, त्यावेळी सुरक्षा दलाने वृद्ध, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलविले. जिरीबाम शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेले बोरोबेकरा घनदाट जंगलांनी वेढलेले आणि डोंगराळ भाग आहे.

Exit mobile version