| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शिवसेना शिंदे गटातील नवे नेते दिलीप भोईर यांना अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील हल्ला प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शिक्षा जाहीर झाल्यापासून भोईर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र आ. दळवी यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना फोन करुन त्यांना तळोजा कारागृहात पाठविण्याचा सल्ला दिल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे दळवी यांनीच भोईरांचा गेम केला का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
2012 मध्ये दिलीप भोईर व त्यांच्या साथीदारांनी चोंढी येथील व्हि टेक कॉम्प्युटर सेंटरवर हल्ला करून काही जणांना मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दिलीप भोईर यांच्यासह 21 आरोपींना अलिबाग न्यायालयाने 30 ऑक्टोबर रोजी 7 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यापासून दिलीप भोईर यांच्यासह चार आरोपी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र गुरुवारी रात्री अचानक या सर्वांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले. भुमीपूजनाच्या कार्यक्रमात आमदारांनी शल्यचिकित्सकांना फोन करुन भोईरांना तळोजात पाठविण्याचे आदेश दिला असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबाबत सत्यता पडताळण्यासाठी शल्यचिकित्सकांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे डॉ. निशिकांत पाटील यांच्या कामकाजावर संशय निर्माण झाला असल्याची चर्चाही जोर धरीत आहे.
दरम्यान न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दिलीप भोईर आवास जिल्हा परिषद मतदार संघातून शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार होते. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अलिकडेच दिलीप भोईर यांनी भाजपने हकालपट्टी केल्यामुळे शिंदे गटात प्रवेश केला. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यामुळे शिंदे गटातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. मात्र भोईर यांना शिक्षा झाल्यामुळे त्यांचा मार्ग मोकळा झाला असल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचीही चर्चा होती. आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आमदार दळवी यांच्या या प्रकारामुळे भोईर यांच्या समर्थकांमध्ये दळवी यांच्याविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याची चर्चा सुरु आहे. दळवींनीच भोईर यांना अडकविण्याचा प्रयत्न केला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आवास मतदारसंघासाठी दिलीप भोईर इच्छुक उमेदवार होते. शिंदे गटातून ते उभे राहणार होते. मात्र, आता दळवी यांच्या या व्हिडीओमुळे दळवींबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला ऊत आला आहे. दिलीप भोईर हे गेल्या अनेक महिन्यांपासून शिंदे गटात कार्यरत आहेत. भोईर यांच्या आगमनाने शिंदे गटातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये दळवींबाबत धुसफूस सुरू होती. मात्र, ते उघड बोलत नव्हते. भोईर यांना शिक्षा झाल्याने शिंदे गटातील काही जुन्या कार्यकर्त्यांचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दिलीप भोईर आगामी काळात काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
दिलीप भोईर यांच्यावर रक्तदाबासह इतर आजारांबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या पाच दिवसांपासून सुरु होते. मात्र, ‘त्यांना डिस्चार्ज देऊन तळोजाला पाठवा’, आमदारांच्या या सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमुळे जिल्हा शल्यचिकित्सक मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. तो संपर्क साधण्यामागील नक्की उद्देश काय, असा सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे.
…म्हणून भोईरांवर सुरु होते उपचार
दिलीप भोईर यांना रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गेल्या चार ते पाच दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना गुरुवारी रात्री तळोजा कारागृहात पाठविण्यात आले. मात्र, अचानक रात्री त्यांना का सोडण्यात आले, आमदारांनी शल्यचिकित्सकांवर दबाब का आणला? नेमका प्रकार काय, याबाबत सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरु आहे.
शल्यचिकित्सकांवर कारवाईची मागणी
शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी आमदारांसोबत संबंध जोपासण्यासाठी भोईरांच्या आरोग्याशी खेळ केला का? आमदारांच्या आदेशावर रुग्णाला डिस्चार्ज देता येतो का? रुग्णाचे आरोग्यदेखील आता आमदारांच्या हातात आहे का? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले असून, आरोग्यासोबत खेळ करणाऱ्या डॉ. निशिकांत पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.







