विरार कॉरिडॉर ठरणार जीवनवाहिनी

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
राज्यातील वडोदरा- मुंबई आणि अलिबाग – विरार अशा दोन महत्त्वाकांशी कॉरिडोरच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाल्याने मुंबई महानगर प्राधिकरण विभागांमध्ये बहुउद्देशीय मार्गिका ही महाराष्ट्राची जीवन वाहिनी ठरणार आहे. मार्च महिन्यामध्ये प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय पारित करण्यात आल्याने त्यानुसार बहुउद्देशीय मार्गीकेच्या सोबतच महावितरण गॅस पाईप लाईन तसेच मुंबई महाउर्जाची उच्च दाबाची विद्युत वाहिनी मार्गक्रमण करणार असल्याचे समजते.

प्रस्तावित तीस मीटर रुंदीच्या बहुउद्देशीय कॉरिडोरच्या अनुषंगाने भूसंपादनाचे कार्य प्रगतीपथावर आहे. तूर्तास अस्तित्वात असणाऱ्या महानगर गॅस पाईपलाईनच्या उजवीकडे तीस मीटर रुंदीच्या भूभागामध्ये बहुउद्देशीय मार्गीका उभारण्यात येणार आहे. मार्च महिन्यात प्रधान सचिव यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की गॅस पाईपलाईन पासून किमान 15 मीटर अंतरापासून दूर मुंबई ऊर्जा महामार्ग प्रोजेक्टची उच्च दाबाची वाहिनी वाहून नेणारे मोनोपोल्स उभारण्यात येतील. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एस इ झेड, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबई ऊर्जा मार्ग प्रायव्हेट लिमिटेड या साऱ्या आस्थापनांनी सदर प्रकल्प एकोप्याने व निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी समन्वय ठेवणार असल्याचे सदर बैठकीत जाहीर केले.

विशेष म्हणजे सारी आस्थापने मिळून बहुउद्देशीय मार्गिका उभारत असल्या कारणामुळे भूसंपादनासारखे क्लिष्ट व अप्रिय विषयास देखील सर्व मान्यता मिळते. भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांच्यात असणारी संभ्रमावस्था या बैठकीतील अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे दूर होण्यास देखील मदत होईल. राज्यातील वेगवान दळणवळण, तसेच भेडसावत असणाऱ्या विजेचा तुटवडा या साऱ्या गोष्टी बहुउद्देशीय मार्गिकेच्या माध्यमातून साध्य होणार असल्यामुळे या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर तो महाराष्ट्र राज्याची जीवनवाहिनी म्हणून अनन्यसाधारण असे महत्त्व अधोरेखित करेल.

Exit mobile version