| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यटनस्थळी असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अधिक उंचावावी यासाठी आ. महेंद्र थोरवे यांनी येथील नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळेमध्ये व्हर्चुअल क्लासची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, त्यासाठी पालिकेच्या हुतात्मा वीर भाई कोतवाल विद्यालयातील शाळेच्या इमारतीची पाहणी केली.
माथेरानमधील शालेय विद्यार्थ्यांना मुंबईमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करता यावी म्हणून नगरपरिषद शिक्षण मंडळाने येथील शाळांचा दर्जा सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पालिकेच्या हुतात्मा वीर भाई कोतवाल विद्यालयातील एका वर्गाचे व्हर्चुअल क्लासमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात या शाळेतील एका वर्गात दृकश्राव्य पद्धतीने डिजिटल शिक्षण देण्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाच्या धोरणानुसार व्हर्चुअल क्लास रूम ही संकल्पना राबविली जाणार आहे. त्यात विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या मुंबई येथील क्लास रूममध्ये थेट मार्गदर्शन होणार असून, ते मार्गदर्शन आणि विशेष अभ्यासक्रम हे ऑनलाईन पद्धतीने शिकवले जाणार आहेत.
राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून ही संकल्पना स्थानिक आमदार महेंद्र थोरवे हे राबविणार असून त्यासाठी माथेरान पालिकेच्या प्रशासक सुरेखा भणगे यांनी कागदोपत्री तयारी पूर्ण केली आहे. या क्लास रूम उभारणीसाठी शाळेची पाहणी आ. महेंद्र थोरवे यांनी केली. त्यावेळी पालिकेच्या प्रशासक सुरेखा भणगे,महसूल विभाग अधीक्षक दीक्षांत देशापंडे, शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, पोलीस अधिकारी शेखर लव्हे आदी सोबत होते.
माथेरानमधील विद्यार्थ्यांना राज्याच्या कानाकोपर्यातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधता येणार आहे. त्याचवेळी विषयातील एक्स्पर्ट हे मार्गदर्शन करणार असल्याने विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळू शकणार आहे. – सुरेखा भणगे, प्रशासक