| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंडियन प्रीमियर लीगमधील दिल्ली कॅपिटलचा खेळाडू पृथ्वी शॉच्या खेळाबद्दल ज्येष्ठ क्रिकेटपटून विरेंद्र सेहवाग याने नाराजी व्यक्त केली आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघ सलग दोन सामने हरला आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नर संघाचे नेतृत्व करत आहे. पृथ्वी शॉने पहिल्या दोन सामन्यात वॉर्नरसोबत डावाची सुरुवात केली. शॉ पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप ठरला आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शॉला मार्क वुडने 12 धावांवर बाद केले होते. त्यानंतर गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने त्याला 7 धावांवर बाद केले. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग शॉ ज्या प्रकारे आउट होत आहे, त्यावरून तो अजिबात खूश नाही.
सेहवागने क्रिकबझवर शॉच्या कामगिरीवर निशाणा साधला आहे. वीरेंद्र सेहवाग म्हणाला, पृथ्वी शॉनेही आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे. शुबमन गिलकडे बघा, जो त्याच्यासोबत अंडर-19 क्रिकेट खेळला आणि आता भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळत आहे. पण शॉ अजूनही आयपीएलमध्ये संघर्ष करत आहे. ऋतुराज गायकवाडनेही आयपीएलच्या एका मोसमात 600 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉच्या एकूण आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने 65 डावांत 24.72च्या सरासरीने एकूण 1607 धावा केल्या आहेत. शॉच्या खात्यात एकूण 12 आयपीएल अर्धशतकं आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 147.3 आहे. परंतु मोठी खेळी न खेळणे हे त्याच्यासाठी आणि त्याच्या फ्रँचायझी संघासाठी चिंतेचे कारण आहे. शॉची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या 99 आहे.