उरण: नौदल शस्त्रागारामधील विशाल महेशकुमार बेपत्ता; परिवाराकडून संशय व्यक्त

। उरण । घन:श्याम कडू ।
उरण तालुक्यातील करंजा बेटावर असणार्‍या नौदलाच्या बेस कॅम्पमध्ये मागील एक वर्षांपासून काम करणारा 22 वर्षीय विशाल महेशकुमार हा कर्मचारी बेपत्ता झाला आहे. याबाबत नौदलाकडून योग्य सहकार्य मिळत नसून, संबंधित प्रकाराबाबत संशयास्पद हालचाली दिसत असल्याचा आरोप विशाल महेशकुमार यांच्या परिवाराकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी परिवाराकडून करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 3 नोव्हेंबर रोजी नौदलाच्या बेसकॅम्पमधून उरण शहरातील स्विमिंग पुलवर पोहण्यासाठी आलेला 22 वर्षीय विशाल महेशकुमार हा तरुण अचानक बेपत्ता झाला. दरम्यान या प्रकाराबाबत नौदलाकडून लपवाछपवीची उत्तरे देण्यात येत असून, संबंधित प्रकाराबाबत नातेवाईक संशय व्यक्त करीत आहेत. विशाल नौदलामध्ये स्वयंपाकी या पदावर काम करत असून, नौदलाकडून विशाल हरवल्याची कोणतीही तक्रार करण्यात आली नाही. तसेच स्विमिंग पुलवर विशालची पार्क करण्यात आलेली मोटारसायकल नौदलाकडून गुपचूप का? नेण्यात आली. तसेच विशालबाबत विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यास अधिकार्‍यांकडून टाळाटाळ केली जात आहे.

विशाल हरावल्यानंतर मुख्य अधिकारी व विशालचा मित्र अचानक रजेवर का जातात? या प्रश्‍नांची उत्तरे आजही मिळत नसल्याने विशालच्या नातेवाईकांकडून नौदलाच्या हालचालीबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेबाबत उच्चस्तरिय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी परिवाराकडून करण्यात येत आहे.

विशाल बेपत्ता होऊन चार दिवस उलटले आहेत. कोणतेही धागेदोरे हाती लागले नसून, विशालचा पत्ता लागावा, अशी मागणी आई-वडीलांकडू करण्यात येत असून, विशालबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही तर आत्मदहन करणार असल्याचेही आई-वडिलांनी म्हटले आहे.

नौदलाच्या बेसकॅम्पमधून एक ऑफिसर बाहेर येतो आणि बेपत्ता होतो, यावर नौदलाकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. हे सगळं संशयाकडे झुकणार असल्याचे नातेवाईक म्हणत असून, याबाबत तात्काळ चौकशी होऊन आम्हांला न्याय मिळावा, अशी मागणी महेशकुमार दिपचंद यांनी केली आहे.

Exit mobile version