सर्व्हेक्षण समितीची कर्जत एस टी आगराला भेट

| कर्जत | वार्ताहर |

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत सर्व्हेक्षण समितीने मंगळवारी (दि.16) सायंकाळच्या सुमारास अचानक कर्जत एस टी आगाराला भेट दिली व तब्बल दोन तास सर्व परिसराची पाहणी केली. तसेच कार्यालयीन कागदपत्रांची तपासणी केली. समितीने कर्जत आगारच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त करून अधिक चांगले आगार होण्यासाठी महत्वाच्या सूचना केल्या.

दुपारी बाराच्या सुमारास ठाणे जिल्ह्याचे विभाग नियंत्रक विकास राठोड यांच्या अध्यक्षतेखालील सर्व्हेक्षण समिती कर्जत एस टी आगारामध्ये आली. विभागीय भांडार अधिकारी संजय कांबळे, प्रवासी मित्र रुदल यादव, विजय मांडे यांचा या समितीमध्ये समावेश होता. आगार व्यवस्थापक मानसी शेळके यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर वाहतुक निरिक्षक देवानंद मोरे, सहाय्यक वाहतुक निरिक्षक महादेव पालवे, वाहतुक नियंत्रक विलास बागुल यांच्या समवेत संपूर्ण आगार परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वच्छता गृहाच्या स्वच्छतेबाबत चांगला अभिप्राय दिला तसेच संपूर्ण आगार परिसरातील स्वच्छता, प्रवासी निवारा, कार्यालयातील कामामध्ये वेगळ्या प्रकारच्या मांडणी बद्दल समाधान व्यक्त केले.

आगार व्यवस्थापकांचे निवास स्थान, उद्घोषणा तसेच इमारतींची दुरुस्ती याबाबत सूचना केल्या. कमी मनुष्यबळ असूनही आगार चांगल्या प्रकारे चालू आहे. याबाबत समिती सदस्यांनी प्रशंसोदगार काढले. समिती अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी ’ प्रवासी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. सूचना प्रवाशांना वाचता येतील अशा ठिकाणी व ठळकपणे असाव्यात. प्रवासी व कर्मचार्‍यांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे.’ अशा सूचना केल्या. त्यानंतर ते खोपोली कडे रवाना झाले.

Exit mobile version