अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेला मदत

। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीतील सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वामींनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कांचन जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जोपासण्याची परंपरा अबाधित ठेवली आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपत्कालीनप्रसंगी कार्यरत असलेल्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला मोटर बोटच्या इंजिनची भेट देऊन वेगळेपण जपले.

पूर परिस्थितीत किंवा जलसाठ्याच्या ठिकाणी झालेल्या अपघातात मदतीसाठी धाव घेणार्‍या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेकडून वापरल्या जाणार्‍या रबरी बोटसाठी इंजिनची आवश्यकता असल्याची बाब कांचन जाधव यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी संस्थेस आर्थिक हातभार लावून इंजिन उपलब्ध करुन दिले. खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या उपस्थितीत एका छोटेखानी कार्यक्रमात ते इंजिन सुपूर्द केले.

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांनी आपत्कालीनप्रसंगी धावून जाणार्‍या समाज बांधवांच्या हाती राखी पौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर बोटीचे इंजिन देऊन कांचन जाधव यांनी जागरुक भगिनीचे कर्तव्य पार पाडल्याच्या भावना व्यक्त केल्या.

Exit mobile version