| वाशी | वार्ताहर |
हजारो किलोमीटरचा प्रवास करून ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर म्हणजेच तिबेटी खंड्या हा ठाणे खाडीतील फ्लेमिंगो अभयारण्यात आला आहे. यामुळे पक्षीप्रेमी, पक्षी निरीक्षक व छायाचित्रकार आनंदी झाले आहेत. ठाणे खाडी परिसरात फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात येत असतात. त्याचप्रमाणे काही दुर्मिळ पक्षीदेखील येतात. नुकतेच फ्लेमिंगो अभयारण्यात दुर्मिळ तिबेटी खंड्या पक्षीप्रेमींना दिसून आला आहे. यामुळे पक्षीप्रेमी व अभ्यासकांसाठी ही पर्वणी आहे, असे कांदळवन विभागाचे आधिकारी प्रशांत बहादुरे यांनी सांगितले.
भारतात किंगफिशर पक्षाच्या एकूण 12 प्रजाती आढळतात. त्यापैकी ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर अर्थात तिबेटी खंड्या हा आकाराने सर्वांत लहान आहे. हा पावसाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत आढळणारा पक्षी आहे. हा पक्षी सध्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यामध्ये आढळून आला आहे. तिबेटी खंड्याची लांबी 12 सेमी ते 14 सेमी इतकी असते, तसेच नारंगी रंगाची चोच, भेदक काळेभोर डोळे, पिवळे पोट आणि विविध निळ्या रंगछटा असलेले, सुंदर निळ्या रंगाचे ठिपके असलेले पंख आणि डोक्यापासून ते शेपटापर्यंत विविधरंगी छटा यामुळे खंड्या अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतो. ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर हा भूतान आणि भारतातील ईशान्य भागात आढळतो, तसेच तो श्रीलंकेतही आढळतो. पाल, लहान मासे, सापसुरळी, छोटे खेकडे, कोळी, बेडूक इत्यादी त्याचे आवडते खाद्य आहे.