आरोग्य विभागाने गाठला निर्लज्जपणाचा कळस

‘अ’ जीवनसत्वाचे डोसच नाही तर देऊ कोठून? डॉक्टरांची असमर्थता
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामधून 1 ते 6 वयोगटातील 64 बालकांना जीवनसत्व अ चा डोस देण्यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस जे कोणी बालक जीवनसत्वाविना राहिले असतील, त्यांना शुक्रवारी ग्रामीण रूग्णालयामध्ये पाठविण्याचे आवाहन केले असता महमद युसूफ मुश्ताक मुजावर या बालकाचे पालक मुश्ताक मुजावर हे शुक्रवारी पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये गेले असता तेथील डॉक्टरांनी ‘जीवनसत्व अ चे डोस उपलब्ध नाहीत तर कोठून देऊ?’ अशी असर्मथता दर्शविली आहे.

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याने रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व प्रशासन यासंदर्भात पूर्वतयारी करीत असताना पोलादपूर शहरात मात्र 1 ते 6 वयोगटातील 106 मुली आणि 157 मुले अशी 263 बालकांपैकी 24 मुली आणि 36 मुले अशा 64 बालकांना अ जीवनसत्वाचे डोस देण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने संबंधितांसोबत चर्चा करून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता आरोग्य यंत्रणेकडून जीवनसत्वाचे डोस देण्यात येत असल्याची दिशाभूल करणारी उत्तरे देण्यात आली, तर एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत जीवनसत्व अ पासून वंचित राहिलेल्या पोलादपूर शहरातील बालकांची आकडेवारी अधिकृतरित्या देण्यात आली.

यामुळे प्रस्तुत प्रतिनिधींनी संबंधित पालकांना डॉ. सोनावणे यांच्या आवाहनानुसार शुक्रवारी बालकासह पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात जीवनसत्व अ 3 चा डोस घेण्यासाठी आरोग्य पत्रिकेसह जाण्यास सांगितले असता, सदरचा डोस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी महमद युसूफ मुश्ताक मुजावर या बालकाचे पालक मुश्ताक मुजावर यांनी डॉ. सोनावणे यांनी डोस उपलब्ध असून, शुक्रवारी बालकासह ग्रामीण रूग्णालयामध्ये जाण्यास सांगितल्याने आपण आल्याचे सांगितले. मात्र, उपस्थित डॉक्टरांनी सदर जीवनसत्व अ चा एकही डोस शिल्लक नसल्याने कोठून डोस देऊ, अशी असमर्थता दर्शविल्याने मुश्ताक मुजावर यांना त्यांच्या बालकासह डोस न घेताच घरी परतावे लागले.

यामुळे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांची आकडेवारी आणि पालकांची बालकांना डोस देण्यासाठीची तगमग खरी की आरोग्य विभागाची माहिती खरी, असा सवाल निर्माण झाला आहे. मात्र, या सर्व परिस्थितीत पोलादपूर शहरातील तब्बल 64 बालक गेल्या 19 महिन्यांत त्यांचे जीवनसत्व अ 2, अ 3, अ 4 आणि अ 5 हे डोस देण्यापासून वंचित ठेवण्यात आले असताना कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा कशी काय सुसज्ज होणार, असर प्रश्‍नचिन्ह तयार झाला आहे.

Exit mobile version