विठ्ठलनामाची ‘शाळा’ भरली

श्रीकृपा स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा

| चौल | प्रतिनिधी |

वारकर्‍यांच्या वेशभूषेतील लहान मुले, विठ्ठलाची वेशभूषा साकारलेला चिमुकला आणि सोबतीला नऊवारी साडी परिधान करीत डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या छोट्या-छोट्या चिमुकल्या, अशा विठ्ठलमय वातावरणात मंगळवारी (दि. 16) चिमुकल्यांची शाळा भरली. निमित्त होत आषाढी एकदशी सोहळ्याचे. आषाढी एकदशीच्या पार्श्‍वभूमीवर रेवदंडा येथील श्रीकृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

बुधवार दि. 17 ऑगस्ट रोजी साजरी होत असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी, भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. विठुराया अन् आषाढीचे महत्त्व शाळेतील चिुकल्यांनाही समजावे, या उद्देशाने श्रीकृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यावेळी विविध उपक्रम राबविण्यात आले. चिमुकल्यांनी विठुनामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळेतील सर्व विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते. या सोहळ्यासाठी शाळा रंगीबेरंगी फुलांनी सजवली होती. वेगवेगळ्या अभंगांवर चिमुकल्या वारकर्‍यांनी ताल धरला होता. शाळेच्या मुख्याध्यापिका रिया मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी फेर धरुन, फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. खांद्यावर भगवा झेंडा, डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखात विठ्ठलाचे नाम यामुळे सर्व शाळा परिसर विठ्ठलमय झाला होता. यावेळी शिक्षकांनी वारी, दिंडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी रिया मॅडम, अंकिता मॅडम, निधी मॅडम, अक्षता मॅडम, मेघा मॅडम, प्रीती मॅडम, संगीता मावशी आणि संपदा मावशी यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक करण्यात आले.

Exit mobile version