फ्लिपकार्ट आणि स्वदेश फाऊंडेशनचा उपक्रम
। रायगड । प्रतिनिधी ।
ग्रामीण भागातील तरुणांचा विकास करण्यासाठी एक उपक्रम तयार केला आहे. रूरल प्रोस्पेरिटी: एम्पॉवरिंग रूरल युथ थ्रू टार्गेटेड स्किल डेव्हलपमेंट फॉर सस्टेनेबल इनकम्स असं या उपक्रमाचे नाव आहे. त्याअंतर्गत 200 तरुणांचा कौशल्यविकास करून त्यांचे जीवनमान उंचावले जाणार आहे. त्यामुळे या तरुणांच्या घराचे उत्पन्न वर्षाला 80,000 ने वाढवण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
18 ते 35 वयोगटातील तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्यांना इमारतीचे बांधकाम आणि रंगरंगोटी शिकायची आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा 45 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या उपक्रमामुळे या भागातील लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून रोजगारक्षमतादेखील वाढेल. त्याचा जवळजवळ 660 कुटुंबीयांना फायदा होणार आहे. त्यामुळे एकूण 860 जणांना फायदा होणार आहे.
या उपक्रमात काही महत्त्वाच्या संकल्पना अंतर्भूत आहेत- तरुणांना प्रेरणा देणे आणि त्यांचा सहभाग सुनिश्चित करणे, समुपदेशन आणि मूल्यांकन, नोंदणी, प्रशिक्षण, प्रशिक्षणानंतरचे मूल्यांकन आणि झालेल्या रोजगारनिर्मितीचा वेळोवेळी पाठपुरावा करणे. प्रत्येक कौशल्य विकासाची बॅच सुमारे 55 दिवसांची असणार आहे.