| अहिल्यानगर | प्रतिनिधी |
राष्ट्रीय व्हॉलीबॉल निवड चाचणीसाठी महाराष्ट्रातून पात्र खेळाडूंची निवड करण्यासाठी विभागीय व्हॉलिबॉल निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही निवड चाचणी गुरुवारी (दि.14) बालेवाडी-पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, येत्या 4 ते 13 डिसेंबरदरम्यान चीनमधील काल्लन्शिया येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्कूल फेडरेशनच्या मान्यतेने (आयएसएफ) आयोजित जागतिक स्कूल व्हॉलिबॉल (15 वर्षांखालील मुले- मुली) चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय शालेय व्हॉलिबॉल संघ सहभागी होणार आहे. या संघासाठी भारतीय शालेय क्रीडा महासंघाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय निवड चाचणीचे आयोजन 25 ते 30 ऑगस्टदरम्यान पुण्यात केले आहे. राष्ट्रीय निवड चाचणीसाठी महाराष्ट्रातून पात्र खेळाडूंची निवड करण्यासाठी आठही विभागीय निवड चाचणी गुरुवारी (दि.14) बालेवाडी-पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.







