जलजन्य आजारांवर “स्टॉप डायरिया’’ची मात्रा

रायगड जिल्हा परिषदेचे आरोग्य अभियान

। रायगड । प्रतिनिधी ।

शुदध, स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे जलजीवन मिशनअंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांचा उद्देश आहे. या अनुषंगाने रायगड जिल्हा परिषदेने रायगडकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी रायगड जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक गावात जनजागृती पथक दाखल होणार आहे.

या अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी कार्यालये व प्राथमिक शाळा येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येणार आहे. यासाठी गाव स्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यात येणार आहे . एकूण आठ आठवडे हे अभियान चालणार असून प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या वेगवेगळे उपक्रम गाव पातळीवर घेण्यात येणार आहेत.

पाणी शुद्ध करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येणार आहे व शुद्ध पाण्याचे महत्व सांगणेत येणार आहे. या अभियानामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्याची योग्य हाताळणी, स्वच्छता जागृती कार्यक्रम, पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाणी तपासणी बाबत गाव पातळीवर पोस्टर बॅनर्स लावणेत येणार आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील शाळा, अंगणवाड्या प्राथमिक आरोग्यकेंद्रे येथे स्वच्छता जागृती कार्यक्रम घेणेत येणार आहे. ग्रामस्थांमध्ये कचर्‍याच्या वर्गीकरणाच्या बाबतीत जागृती निर्माण करणे यासाठी घरोघरी भेटी देऊन, कचर्‍याचे वर्गीकरण करण्यास प्रोत्साहन देणे याबाबत जनजागृती करणे येणार आहे. अंगणवाड्यामध्ये माता व किशोरी मुलींची स्वच्छता आरोग्य इत्यादी विषयावर मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा योजनेतील पाणी गळती शोधून त्याची दुरुस्ती करणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, घरगुती स्तरावरील पाणी साठवणुकीच्या टाक्यांची स्वच्छता करणे, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करणे, तसेच गावामध्ये ग्रे वॉटर मॅनेजमेंट बाबत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये विशेष करून प्रत्येक सेप्टिक टँक असलेल्या शौचालयांना शोषखड्डा तयार करणे घरातील सांडपाणी परसबाग किंवा शोषखड्डा करून त्यातच सोडणे हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्रोतांची स्वच्छता ठेवणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता याबाबत गावांना सक्षम करण्यासाठी गावातील सर्व घटकांचा या अभियानामध्ये सहभाग घेणेत येणार आहे.छतावरील पाऊस पाणी संकलन करून पावसाचे पाणी साठवण्याच्या तंत्राबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांना सुरक्षित पाणी वापराच्या महत्त्व याबाबत रॅली, पोस्टर ,पथनाट्ये तसेच घरोघरी जाऊन पत्रकांचे वाटप यांच्या मार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. पाणी गुणवत्ता विषयक माहितीबाबत जनजागृती पर कार्यक्रमांचे आयोजन करून घराघरात पिण्याचे शुदध व मुबलक पाणी उपलब्ध होईल, यासाठी जिल्हयातील प्रत्येक गावाने या अभियानात सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे.

डॉ. भरत बास्टेवाड
मुख्य कार्यकारी अधिकारी
रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version