। तळा । वार्ताहर ।
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जास्तीत जास्त लोकांनी नैतिकदृष्ट्या मतदान करण्यास प्रवृत्त व्हावे यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देश पातळीवर स्वीप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या स्वीप कार्यक्रमांतर्गत तळा तालुक्यामध्ये स्वीप पथक स्थापन करण्यात आले आहे. या लोकशाहीचा निवडणुकीचा उत्सव कार्यक्षम रीतीने व प्रभावीपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन तहसीलदार स्वाती पाटील यांनी केले.
बुधवारी (दि.27) द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वीप पथकाच्या माध्यमातून तळा परिसरात मतदार जनजागृती रॅलीच्या आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या प्रारंभी द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा येथील प्रभारी प्राचार्य भगवान लोखंडे यांनी मतदार जनजागृतीची लोकशाहीच्या सशक्तीकरणामधील भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी याप्रती बांधीलकी कायम ठेवावी, असे आवाहन केले.
याप्रसंगी तहसीलदार स्वाती पाटील, निवडणूक नायब तहसीलदार जितेंद्र टेंबे, चंद्रकांत राऊत, किशोर मालुसरे , भारत जाधव, अनिल घोडे, रवी बावदाने, प्राध्यापक वृंद व कार्यालयीन कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.