| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात मतदारांच्या संख्येत फक्त पाच महिन्यांत आठ टक्क्यांनी वाढ झाली. तर, काही बुथवर 20 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचा खळबळजनक दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. ही मतांची चोरी असून, यावर निवडणूक आयोग गप्प का? असा सवाल करत मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित जारी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
बीएलओंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे नोंदवले आहे. माध्यमांनी पडताळणी केलेल्या पत्त्याशिवाय हजारो अतिरिक्त मतदार असल्याचे उघड झाले आहे, तरीही निवडणूक आयोग गप्प आहे? की यात सहभागी आहे. यातील खरी माहिती लपवणे म्हणजे एक प्रकारे चोरी केल्याची कबुली देणेच आहे. म्हणूनच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करतो, असे राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला मॅच फिक्सिंग म्हटले होते. राहुल गांधी म्हणाले, “2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी इतकी खालच्या पातळीवर पोहोचली आहे की त्याची कल्पना करणे कठीण आहे.” राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आणि म्हटले, “मॅच फिक्स करणारी टीम मॅच जिंकू शकते, परंतु त्याच्याशी संबंधित संस्थांवरील विश्वास कायमचा उडून जातो”. ते असेही म्हणाले होते की, “निवडणुकांमध्ये मॅच फिक्सिंग हे कोणत्याही लोकशाहीसाठी विषासारखे आहे.” आयोगाने दिले होते उत्तर राहुल गांधी यांनी लेख लिहून आरोप केले. त्यावर निवडणूक आयोगाने म्हटले होते की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पूर्ण पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली. पूर्ण नियमांचे पालन करण्यात आले, विधानसभा निवडणुकीतील मतदारांची यादी, मतदानाची प्रक्रिया तसेच मतमोजणी ही लोकप्रतिनिधी कायदा 1950, निवडणूक नोंदणी नियम 1960 या कायद्यांच्या अधीन राहूनच करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली होती.
देवेंद्र फडणवीस किती मताधिक्क्याने विजयी?
नागपूरचा दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. देवेंद्र फडणवीस यांनी या मतदासंघातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 42 हजारपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांनी 1,29,401 मतं मिळाली. प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराला 89,691 मतं मिळाली. 1978 पासून 8 वेळा भाजपने या मतदारसंघातून विजय मिळवला आहे.







