बोर्ली मांडला येथे मतदार जनजागृती रॅली

| मुरूड | प्रतिनिधी |

मुरुडचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. बोर्ली आणि मांडला केंद्रातील शिक्षक आणि शिक्षिका येथील मतदाराला जागृत करण्यासाठी रॅली काढून विविध घोषणा देत होते. मतदान हा प्रत्येक प्रौढ मतदाराचा संविधानिक अधिकार आहे. मात्र बरेचदा हा अधिकार सामान्य नागरिकांकडून दुर्लक्षिला जातो. म्हणूनच समाजाच्या सर्व थरातील प्रौढ मतदारांनी सदर हक्क बजावून लोकशाही जपण्याच्या दृष्टीने मतदान करावे, अशी आग्रही भूमिका यावेळी सदर प्रभातफेरीतून घेण्यात आली. ’ मतदार राजा जागा हो ; लोकशाहीचा धागा हो !’ या आणि अशा आशयाच्या घोषणा देऊन नागरिक आणि पर्यायाने मतदार बांधवांचे लक्ष वेधून घेण्यात या रॅलीने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे चित्र जाणवले.

एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षक बंधुभगिनींना विद्यार्थ्यांसारखे घोषणा देताना पाहून परिसरातील सामान्यजनांनाही अप्रूप वाटत होते. शिक्षक रॅली आणि त्यांच्या घोषणांचा मतदानाची टक्केवारी वाढण्यास नक्कीच मदत होईल, असे यावेळी येथील जाणकारांनी बोलून दाखवले. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये मुरुडचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, केंद्रप्रमुख मोहिनी पाटील, पदवीधर शिक्षक महेश कवळे, शरद पाटील, जयवंत पाटील, देवेंद्र तांडेल, महेश भगत, प्रवीण भगत, संतोष पुकळे, अपेक्षा म्हात्रे, मानसी कवळे, रमाकांत ठाकूर, राजेंद्र पाटील,चंद्रकांत काटकर, मिस्रिकसर, रुपाली वाजंत्री मिळून सुमारे 80 जण सहभागी झाले होते.

Exit mobile version