अंगणवाडी सेविका, बचत गट सदस्य आणि नागरिक सहभागी
| नेरळ | प्रतिनिधी |
मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा राजा हो.. मतदान करा.. लोकशाही बळकट करा अशा आशयाचे फलक घेवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये नेरळ मधील बचत गटांनी तसेच अंगणवाडी सेविका आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता. तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नेरळ मंडळ अधिकारी कार्यालयाकडून निघालेल्या रॅलीत नेरळ विभागातील अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच महिला बचत गटांच्या महिला यांच्यासह मोठया संख्येने नागरिक सहभागी झाले होते. तालुक्याचे तहसीलदार डॉ. शीतल रसाळ आणि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी रॅली ला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रॅली मतदार राजाला आवाहन करणाऱ्या घोषणा देत पुढे निघाली. चावडी येथून निघालेली रॅली पुढे हुतात्मा हिराजी पाटील चौकातून माथेरान नेरळ रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी महावीर पेठ जुनी बाजारपेठ अशी बापूराव धारप सभागृह येथे पोहचली. तेथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे रॅलीचा समरोप तहसीलदार डॉ. रसाळ यांनी मार्गदर्शनाने झाला. त्याआधी तहसीलदार यांनी रांगोळी स्पर्धेतील सहभागी कलाकार यांनी काढलेल्या रांगोळ्या यांची पाहणी केली.
हा सर्व कार्यक्रम नेरळ मंडळ अधिकारी कार्यालयाने तयार केला होता. त्यावेळी रॅलीचे संयोजन नेरळ मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांनी केले होते. त्यांच्या मदतीला कळंब येथील मंडळ अधिकारी अरुण विषे, चिंचवली येथील मंडळ अधिकारी वैशाली पाटील, पाथरज मंडळ अधिकारी किरण बेलोस्कर, कशेले मंडळ अधिकारी बाबासो शेकटे यांच्यासह तलाठी विकास गायकवाड, उमेश भोरे, अनिल कांबळे, वैशाली मानते, तलाठी माधुरी चौधरी, कोतवाल अशोक भगत, दिपक पेरणे, सुनिल गायकवाड, तसेच छगन फराट, दूंदा गायकवाड, अर्चना म्हसे, यांचा सहभाग होता. या रॅलीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नागो गवळी, आदिवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष परशुराम दरवडा, नेरळ जेष्ठ नागरिक संघाचे संचालक मधुकर गवळी तसेच अनेक नागरिक सहभागी झाले होते.