मतदार देणार निष्ठेला साथ!
| चौल | प्रतिनिधी |
चौल जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक यंदा केवळ आकड्यांची किंवा उमेदवारांची लढाई राहिलेली नाही. ही निवडणूक म्हणजे निष्ठा विरुद्ध गद्दारी, स्थानिकांचा हक्क विरुद्ध दलाली आणि खरा विकास विरुद्ध खोट्या श्रेयलाटेचा थेट संघर्ष ठरला आहे. या संघर्षात शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि मनसेचे- महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि विरोधी पक्षनेते सुरेंद्र मोरेश्वर म्हात्रे हे अत्यंत ठाम, स्पष्ट आणि रोखठोक भूमिकेत समोर आले आहेत. प्रचारादरम्यान त्यांनी चौल मतदारसंघातील ज्वलंत प्रश्नांवर निर्भीडपणे भाष्य केले आहे.
चौल, नागाव आणि रेवदंडा या तीन प्रमुख गावांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही गंभीर आहे. उमटे धरणावर जवळपास 1 लाख लोक रोज अवलंबून असतानाही अनेक भागांत आजही नळाला पाणी नाही, ही वस्तुस्थिती लपवून चालणार नाही, असे सुरेंद्र म्हात्रे यांनी ठामपणे सांगितले. मागील जिल्हा परिषद कार्यकाळात उमटे धरणातील गाळ काढणे, धरणाचे मजबुतीकरण करणे आणि घरोघरी नळाद्वारे पाणी पोहोचवण्याची योजना अंतिम टप्प्यात असताना, जिल्हा परिषद बरखास्त झाली. त्यानंतर प्रशासकीय राजवट आल्याने हा प्रश्न मागे पडला. मात्र, आता जनता प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ठोस पावले उचलणार, असा शब्द त्यांनी दिला. उमटे धरणाच्या दुरुस्तीसाठी 100 कोटींचा निधी मंजूर झाला, त्यातील 8-10 कोटींचे काम केल्याचे सांगण्यात आले; परंतु, कधी आणि कुठले काम केले हे शोधण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. पाण्यासाठी जाहीर झालेल्या निधीचा हिशेब जनतेसमोर यायलाच हवा, असेही ते म्हणाले.
पर्यटनाच्या बाबतीत चौल मतदारसंघाला अफाट संधी आहेत. वेगाने वाढणारे पर्यटन, चौल परिसरातील कृषी पर्यटन, नारळ-पोफळीच्या बागा, समृद्ध निसर्गसंपदा आणि तब्बल साडेतीनशे मंदिरेही चौलची खरी ओळख आहे. मात्र, या पर्यटनाचा फायदा स्थानिक युवक, महिला आणि छोटे व्यावसायिकांना मिळण्याऐवजी दलाल प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात जात असल्याची खंत सुरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केली. पर्यटनाच्या नावाखाली वाड्या-वस्त्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत, शेती भकास केली जात आहे आणि स्थानिकांना त्यांच्या हक्काच्या जमिनींपासून दूर लोटण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोठे रिसॉर्ट आणि पॉश हॉटेल्स उभे राहात असताना, स्थानिकांचे छोटे कॉटेज व्यवसाय उद्ध्वस्त होत आहेत. हा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. चौलची जमीन ही चौलकरांची आहे, हा स्पष्ट आणि ठाम इशारा सुरेंद्र म्हात्रे यांनी दिला.
आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था असून, याविरोधात आवाज उठवण्याचा इशारा त्यांनी दिला. रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर दोन जिल्हा परिषद मतदारसंघांतील सुमारे 90 हजार नागरिक आणि आसपासच्या 10 हजार नागरिकांचा भार आहे. जवळपास 1 लाख लोक अवलंबून असलेले हे केंद्र आज मूलभूत सुविधांशिवाय चालते आहे. मागील कार्यकाळात जीर्ण इमारत पाडून सर्व सुविधांनी सुसज्ज नवे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा ठराव मांडण्यात आला होता. दुर्दैवाने प्रशासकीय राजवटीमुळे तो प्रश्न मागे पडला. मात्र, यावेळी हा प्रश्न पूर्ण करूनच दाखवणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आयुष्यभर कष्ट करून कुटुंब आणि गाव उभे करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना शांतता, सन्मान आणि माणुसकी मिळावी, ही माझी जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी हिरवळ, सावली, बसण्याची सोय असलेले ‘नानानानी पार्क’ उभारले जाणार आहेत. हे पार्क केवळ मोकळी जागा नसून, ज्येष्ठांच्या आयुष्याला दिलेला मान असेल, अशी त्यांची भूमिका आहे.
मोबाईल आणि सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेली आजची तरुण पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे चौल मतदारसंघातील विविध गावांत तरुणांसाठी ओपन जिम उभारण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे. त्याचबरोबर आधुनिक डिजिटल युगाची गरज ओळखून मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. वर्क फ्रॉम होम, डिजिटल रोजगार, ऑनलाइन शिक्षण या संधींपासून चौलचा युवक मागे राहू नये, हे त्यांचे स्वप्न आहे.
विकासकामांच्या श्रेयावर सुरू असलेल्या नौटंकीवर सुरेंद्र म्हात्रे यांनी थेट बोट ठेवले. चौल, नागाव आणि रेवदंडामधील कोट्यवधी रुपयांची अनेक कामे शिवसेना एक असताना, तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या काळात मंजूर झालेली आहेत. आज तीच कामे सुरू असताना त्यांचे श्रेय घेण्यासाठी बॅनरबाजी सुरू आहे. मंजूर कामांसाठी कोणताही संघर्ष न करता, पक्षप्रवेश करून त्याग केल्याचा आव आणणे म्हणजे जनतेच्या बुद्धीची थट्टा आहे.
आग्राव रस्त्याचा प्रस्ताव आम्ही 2022 मध्ये देऊन 2024 मध्ये मंजूर झाला असताना, जुलै 2025 मध्ये पक्षप्रवेश करून या रस्त्यासाठी प्रवेश केला, असे सांगणे म्हणजे आयत्या पिठावर रेघा ओढण्याचा प्रकार असल्याचे सांगत त्यांनी शिंदे गटाचा उमेदवार सचिन राऊळचा समाचार घेतला. स्वतःच्या विकासासाठी, स्वतःची इमारत, व्यवसाय किंवा राजकीय सोय वाचवण्यासाठी केलेला पक्षप्रवेश म्हणजे जनतेच्या विकासाशी केलेली गद्दारी असल्याचे देखील ते म्हणाले. विकासाच्या नावाखाली पक्ष बदलणे म्हणजे जनतेच्या विश्वासाशी केलेली गद्दारी आहे. ज्या पक्षाने नाव, ओळख आणि संधी दिली, ताकद दिली, त्याच पक्षाशी गद्दारी करून विकासाच्या नावाखाली दुसऱ्या पक्षात जाणे ही नैतिकतेची पायमल्ली आहे. विकास हा पक्ष बदलून नाही, तर जनतेसाठी संघर्ष करून साधला जातो, असेही त्यांनी ठासून सांगितले.
सुरेंद्र म्हात्रे यांची राजकीय भूमिका स्पष्ट आहे. एक विचार, एक पक्ष आणि एक निष्ठा. बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे आदर्श असून, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शि वसेनेचे विचार घेऊन ते काम करत आहेत. कोणतेही खोटे आमिष न दाखवता, कोणतीही गद्दारी न करता समाजाचे काम करायचे, गोरगरीबांना मदतीचा हात द्यायचा आणि जे मिळेल त्यात समाधान मानायचे, हा त्यांचा राजकीय आणि वैयक्तिक मंत्र आहे. पाणी, आरोग्य, रस्ते, पर्यटन, शेती, तरुण, ज्येष्ठ नागरिक, व्यसनमुक्ती, जमीन संरक्षण आणि प्रामाणिक विकास या सगळ्या मुद्द्यांवर ठामपणे काम करून चौल मतदारसंघाचा सर्वांगीण आणि न्याय्य विकास साधण्याचा त्यांचा निर्धार आहे. चौल, नागाव, रेवदंडा, वरंडे, देवघरची जनता सुज्ञ आहे. ती विकास आणि दलाली, निष्ठा आणि गद्दारी यातील फरक ओळखते. याच विश्वासावर ‘चौलमध्ये गद्दारीला लाथ आणि निष्ठेला साथ’ देण्याचे आवाहन सुरेंद्र मोरेश्वर म्हात्रे यांनी केले आहे.
स्वतःची इमारत वाचवण्यासाठी पक्षप्रवेश!
ज्यांनी आता दोन-तीन महिन्यांपूर्वी प्रवेश केला, ते सांगतात आम्ही ही कामे मंजूर करुन आणली. खोटं बोलण्याला काही सीमा असते, हे त्यांनी जाणायला हवे. चौलचा विकास करणारे काय सांगताहेत, आम्ही कामे मंजूर करुन आणली आहेत. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, माझ्याकडे वर्कऑर्डर आहेत. चौल-आग्राव रस्त्यावरुन जे मोठेपणाने, छाती फुगवून सांगत आहेत, आम्ही काम आणले, त्यांना मी एकच सांगतो, हे काम मी 2024 मध्ये मंजूर करुन आणले आहे. चार कोटी 20 लाख रुपयांचे आणि आता समोरचे उमेदवार आहेत, त्यांनी जुलै 2025 ला प्रवेश केला. म्हणजे साधारण दीड वर्षांनंतर प्रवेश केला. आणि, ते सांगतात, आग्रावच्या रस्त्यासाठी मी प्रवेश केला. त्यांना आग्रावच्या रस्त्यासाठी प्रवेश नव्हता केला, त्यांनी स्वतःचं घर वाचवण्यासाठी, स्वतः बांधलेली नागाव ऑफिसजवळील रस्त्यावरची इमारत वाचवण्यासाठी प्रवेश केला आहे, हे येथील सर्वसामान्य जनतेला आतातरी कळायलाच हवे. आश्चर्याचे म्हणजे, त्यांनी स्वतः येऊन मला सांगगिले होते, माझ्यासमोर कबुली दिली होती की, आमदार मला धमकवत आहे, जर मी शिंदे गटात प्रवेश नाही केला, तर इमारत पाडण्यात येईल.
विकासकामांची फक्त नौटंकी
ज्या पक्षाने नाव दिले, सर्व काही दिले, त्याच्यासोबत यांनी गद्दारी केली. स्वार्थासाठी पक्षप्रवेश करुन आज विकासासाठी पक्षप्रवेश केल्याची नौटंकी सुरू आहे. परंतु, येथील जनता दूधखुळी मुळीच नाही, अशा गद्दाराला त्याची जागा दाखवून देईल. कारण, मी कोणत्याही आमिषासाठी माझी पक्षाबरोबरची निष्ठा गहान ठेवली नाही. निष्ठावंत म्हणून एक निष्ठ आहे. माझा एकच पक्ष, एकच नेता, आणि एकच विचार करुन मी आयुष्यभर जगलो आहे. बाळासाहेब माझे आदर्श आणि ते माझे दैवत आहेत, आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे विचार घेऊन मी पक्षात काम करतोय. त्यामुळे एक विचार घेऊन जो जातो, तोच जनतेचे काम करु शकतो, स्वतःच्या स्वार्थासाठी जाणारा, दुसऱ्याचे-जनतेचे काम करु शकत नाही. माझा कुठलाही स्वार्थ नाही. माझी तळमळ आहे, समाजाचे काम करायचं, गोरगरीबांचे, अडचणीत असलेल्यांना मदतीचा हात देण्याचे आणि जे जे मिळेल, त्याच्यात समाधान मानायचे. तुम्ही फक्त समाजाचे काम दाखवायचे आणि आपली घरे, बंगले, माड्या उभारण्याचे काम मी केलेले नाही. खोटे आमिष दाखवून मी कोणाला फसवण्याचा काम केलेले नाही. आयुष्यात करणार नाही.
तरुणांना व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न
राजकारणासाठी तरुणांना व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गंभीर असल्याचे सुरेंद्र म्हात्रे म्हणाले. मते मिळवण्यासाठी दारू पार्ट्या, व्यसनांचे आमिष आणि काही ठिकाणी ड्रग्सपर्यंत मजल गेल्याच्या तक्रारी दुर्लक्षित करता येणार नाहीत. ही उद्याची पिढी म्हणजे आपल्या गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे आणि देशाचे भविष्य आहे. या पिढीला बरबाद करण्याचा कोणताही प्रयत्न कदापि खपवून घेतला जाणार नाही. गरज पडली तर राजकारणाच्या पलीकडे जाऊनही या घाणेरड्या प्रवृत्तींना थांबवणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
