| पनवेल | वार्ताहर |
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवरती स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्यावतीने ‘स्वाक्षरी अभियान’ राबविले जात असून आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी स्वाक्षरी फलकावरती स्वाक्षरी करून या अभियानाचे उद्घाटन केले.
या स्वाक्षरी अभियानांतर्गत मोठा स्वाक्षरी फलक महापालिका मुख्यालयात उभा करण्यात आला आहे. उद्घाटन प्रसंगी अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी ज्योती कवाडे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त मारुती गायकवाड, शहरअभियंता संजय जगताप, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, उपमुख्य लेखापरिक्षक संदिप खुरपे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सहायक आयुक्त स्वरूप खारगे, उपअभियंता विलास चव्हाण सर्वांनी आपली स्वाक्षरी करून मतदान करण्याबाबत संदेश दिला. या पध्दतीने वडाळा तलाव व पनवेल रेल्वे स्थानकावरती देखील स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार आहे.
याबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघामधील 188 पनवेल विधानसभा मतदार संघांत आशा सेविका बैठका घेऊन मतदार जनजागृती करत आहेत. तसेच, चारही प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन मतदान जनजागृतीपर पत्रकाचे वाटप करत आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल, वळवली व पंचशील नगर येथे बचत गटांच्या बैठका घेऊन मतदान करण्याबाबत जनजागृती केली जात आहे.