बोलीभाषेतून मतदान जनजागृती

आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विभागाचा उपक्रम

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत काम सुरु करण्यात आले आहे. त्यामध्ये आदिवासी, ठाकूर, समाजदेखील आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. आदिवासी विकास प्रकल्प विभागाने पुढाकार घेत आदिवासी, ठाकूर समाजातील मतदारांना बोलीभाषेतून मतदान करण्याचे आवाहन, मतदानाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सुमारे साडेचार हजार नागरिकांपर्यंत ही जनजागृती करण्यास यश आले आहे. रायगड लोकसभा मतदार संघातील मतदान सात मे रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होणार आहे. जिल्ह्यातील दोन हजार 185 मतदान केंद्रामध्ये मतदान होणार आहे. 16 लाख 68 हजार 372 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये महिला आठ लाख 47 हजार 763, महिला आठ लाख 20 हजार 605 व तृतीय पंथी चार मतदारांचा समावेश आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणेबरोबरच खासगी संस्था, संघटनांना आवाहन केले. जिल्ह्यातील आदिवासी, ठाकूर समाजाने देखील पुढाकार घेत या उपक्रमात सहभाग घेतल्याचे चित्र आहे. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशीकला अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 15 ठिकाणी 48 आदिवासी, ठाकूर वाड्यांमध्ये पथनाटय घेण्यात आले. बोली भाषेतून या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदानाचे महत्व पटवून देण्याचे काम करण्यात आले आहे. आतापर्यंत साडेचार हजार नागरिकांपर्यंत हा प्रचार करण्यास यश आल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये सुधागड अलिबाग पेण महाड व रोहा, या ठिकाणी हे उपक्रम राबविण्यात आले आहेत.

Exit mobile version