| नवीन पनवेल | वार्ताहर |
आदई येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने हिल व्ह्यू कॉम्प्लेक्स सहकारी गृहनिर्माण संस्था आदई यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. नेरे , आदई परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आदई परिसरात वारंवार वेगवेगळ्या कारणास्तव वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सततच्या विद्युत पुरवठा खंडित होण्यामुळे उपकरणे देखील खराब होतात. खंडित होणार्या वीज पुरवठा बाबत नेरे शाखेच्या अधिकार्यांना एका वर्षापासून भेटून आणि लेखी निवेदन देऊन देखील उपाययोजना आणि कार्यवाही झालेली नसल्याचे हिल व्ह्यू कॉम्प्लेक्स सहकारी गृहनिर्माण संस्थेचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही तर या संस्थेच्या पदाधिकार्यांनी विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे तसे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिला आहे.