23 नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी मतदान पूर्ण
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी शनिवारी (दि. 20) मतदान पार पडले. मतदानाची अधिकृत वेळ संपूनही अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू राहिल्याचं चित्र दिसून आलं. दरम्यान, अनेक ठिकाणी शांततेत मतदान पार पडत असलं तरी काही ठिकाणी निवडणुकीला गालबोट लागलं. नांदेडमधील धर्माबादमध्ये महिलांना मंदिरात आणि मंगल कार्यालयात डांबून ठेवल्याची घटना समोर आली. तर, अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने बोगस मतदान आणल्याचा आरोप भाजपने केला.
अंबनाथमध्ये 208 बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजपनं शिंदेंच्या सेनेवर केला आहे. मतदानासाठी अनेक महिलांना एका सभागृहात गोळा केल्याचा आरोप भाजपच्या अभिजीत करंजुलेंनी केला आहे. यानंतर भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर काही वातावरण चांगलंच तापलं होतं. अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरात पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. भाजप मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसनेनं केला होता.
नांदेडमधील धर्माबादमध्ये मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला. भाजपनं शेकडो मतदारांना पैशांचं आमिष दाखवून बोलावून घेतलं आणि कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला. प्रसादाच्या स्वरूपात चार हजार रुपये देणार असल्याचं सांगून मंदिरात ठेवल्याचा आरोप महिलांनी केला. कप बशीचं निवडणूक चिन्ह असलेल्या लोकांनी सकाळपासून डांबून ठेवल्याचा आऱोप महिलांचांनी केला. तुमच्या समाजाच्या नेत्यापाशी पैसे देतो म्हणून कुंभार समाजातील महिला नजर कैदेत ठेवल्याचा आरोप करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील वार्ड क्रमांक तीनमधल्या एमआर हायस्कूल मतदान केंद्रावर वाद झाला. गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ यांना मतदान केंद्रात का सोडले, असा आक्षेप विरोधकांनी घेतला. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचं वातावारण होतं. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवला.
कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली, मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटाकडून करण्यात आला. पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांध्येही शाब्दिक चकमक झाली. कोपरगावमधील एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.
बारामती नगरपालिकेसाठी आज मतदान होतं, यावेळी एका मतदाराच मतदानच आधी कोणीतरी करून गेलं असल्याचं समोर आलं आहे. बारामतीतील अहिल्यानगर देवी क्लब या मतदार केंद्रात हा प्रकार घडला. अमित दिलीप कुलथे यांचे मतदान आधीच झालं होतं. अमित कुलथे मतदान केंद्रात दाखल झाले आणि त्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर त्यांच्याकडून निवडणूक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी टेंडर वोट फॉर्म भरून घेतला आणि त्यानंतर अमित कुलथे यांनी मतदान केलं.
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत ऐन मतदानादिवशी मतदान केंद्राबाहेर जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला. भारत माता शाळा मतदान केंद्राबाहेर काळी बाहुली, लिंबू आणि इतर साहित्य आढळलं.
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर नगर परिषदेच्या तीन जागांसाठी मतदान पार पडलं. सिन्नरच्या प्रभाग 2 च्या मतदान केंद्रावर बोगस मतदाराला पकडण्यात आलंय. निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यात दिलं. भावाच्या जागेवर मतदानासाठी आलेल्या मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं.







