जिल्हा बँकेसाठी शनिवारी मतदान

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक शनिवार ( दि. 16 सप्टेंबर ) रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत होणार आहे. चार मतदानकेंद्रात एक हजार 369 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांसाठी ही निवडणूक असून 18 जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे फक्त तीन जागांसाठी मतदान होणार आहे. यापैकी इतर शेती सहकारी संस्था मतदार संघामधून आ. जयंत पाटील रिंगणात उभे आहेत. महिला राखीव मतदारसंघाच्या दोन जागांसाठी मतदान होणार असून प्रिता चैौलकर, मधुरा मधुस्टे रिंगणात आहेत.जिल्ह्यातील अलिबाग, माणगाव, पेण, व खालापूर या चार केंद्रामध्ये मतदान होणार आहे.

अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्यातील मतदारांसाठी अलिबागमधील नगरपरिषदेची उर्दू शाळा,पेण, सुधागड तालुक्यातील उमेदवारांसाठी पेण येथील सार्वजनिक शाळा, उरण, पनवेल, खालापूर कर्जत तालुक्यातील मतदारांसाठी खालापूरमधील गंगाराम शेट इंग्लीश मिडीअम स्कूल व पोलादपूर, महाड, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, तळा या तालुक्यातील मतदारांसाठी माणगावमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतदान होणार आहे.

या निवडणूकीसाठी 24 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून ही निवडणूक मतपत्रिकेद्वारे केली जाणार आहे. मतदानकेंद्रापासून शंभर मीटर अंतरावर कोणालाही फिरकू दिले जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक 16 सप्टेंबरला चार मतदान केंद्रात होणार आहे. ही प्रक्रीया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील कर्मचारी कामाला लागले आहे. मतदान केंद्रात नियुक्त केलेले कर्मचारी केंद्रावर रवाना झाले आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रीयेला सुरुवात होणार आहे.

प्रमोद जगताप- जिल्हा उपनिबंधक


Exit mobile version