2 लाख 42 हजार 529 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्ह्यातील 10 नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी (दि.1) रात्री दहा वाजता थंडावल्या. या निवडणूकीत नगरसेवक पदाच्या 217 जागांपैकी 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. त्यामुळे 209 नगरसेवक जागांसाठी तर नगराध्यक्षपदाच्या दहा जागांसाठी लढत होणार आहे. एकूण 219 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मंगळवारी (दि.2) सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. मतदान 281 केंद्रामध्ये होणार आहे. या प्रक्रियेत 2 लाख 42 हजार 529 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणूकीचे मतदान 2 डिसेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मतदानापासून मतमोजणीसाठी लागणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. त्यामुळे यंत्रणा सज्ज आहे. सुमारे दोन हजारहून अधिक कर्मचारी या निवडणूकीच्या कामासाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, श्रीवर्धन, मुरूड-जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत, माथेरान या नगरपरिषदांमध्ये नगरसेवकपदासाठी 595 व नगराध्यक्षपदासाठी 34 असे एकूण 629 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. या नगरपरिषदांच्या हद्दीत 107 प्रभाग आहेत. नगराध्यक्षपदाच्या दहा आणि नगरसेवकपदाच्या 217 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. खोपोलीमध्ये नगराध्यक्षपदासाठी सात व नगरसेवकपदासाठी 118, अलिबागमध्ये नगराध्यक्षपदासाठी 2 व नगरसेवक पदासाठी 42, श्रीवर्धनमध्ये नगराध्यक्षपदासाठी 4 आणि नगरसेवक पदासाठी 60, मुरूडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 3 व नगरसेवक पदासाठी 58, रोह्यात नगराध्यक्षपदासाठी 2 व नगरसेवकपदासाठी 51, महाडमध्ये नगराध्यक्षपदासाठी 5 व नगरसेवक पदासाठी 53, पेणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 3 व नगरसेवक पदासाठी 72, उरणमध्ये नगराध्यक्षपदासाठी 4 आणि नगरसेवक पदासाठी 49, कर्जतमध्ये नगराध्यक्षपदासाठी 2 आणि नगरसेवक पदासाठी 46, माथेरानमध्ये नगराध्यक्षपदासाठी 2 व नगरसेवक पदासाठी 46 उमेदवार आहेत. या उमेदवारांमध्ये अंतिम लढत होणार आहे.
मतदान प्रक्रीया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मतदान दोन डिसेंबरला 281 केंद्रामध्ये होणार आहे. दोन लाख 42 हजार 529 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात एक लाख 18 हजार 423 महिला व 1 लाख 19 हजार 78 पुरुष मतदारांसह मतदारांचा समावेश आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासाकडून तयारी जोरात करण्यात आली आहे. जिल्ह्यातून सुमारे दोन हजार कर्मचारी नियूक्त करण्यात आले आहेत. मतदान केंद्रापासून शंभर मीटर परिसरात गर्दी करण्याबरोबरच विनाकारण फिरणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. मतदान केंद्रापासून शंभर मीटर परिसरात व केंद्रापर्यंत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केली जाणार आहे.
अलिबागमध्ये 19 केंद्रामध्ये होणार मतदान
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसच्या उमेदवार अक्षया प्रशांत नाईक यांच्यासह दोघेजण रिंगणात आहेत. नगरसेवक पदाच्या 20 जागांमध्ये एक जागा बिनविरोध जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसचे उमेदवार प्रशांत नाईक बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता नगरसेवक पदाच्या 19 जागांसाठी 42 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणूकीचे मतदान 19 केंद्रामध्ये होणार आहे. 16 हजार 354 मतदार मतदानाचा हक्क बजाणार आहेत.
हे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार
थेट नगराध्यक्षपदासाठी अक्षया प्रशांत नाईक,नगरसेवकपदासाठी प्रभाग एकमधून संतोष मधूकर गुरव, संध्या शैलेश पालवणकर. प्रभाग दोनमधून सुषमा नित्यानंद पाटील. प्रभाग तीनमधून साक्षी गौतम पाटील, आनंद अशोक पाटील, प्रभाग चारमधून रेश्मा मनोहर थळे, महेश वसंत शिंदे. प्रभाग पाचमधून निवेदिता राजेंद्र वाघमारे, समिर मधूकर ठाकूर. प्रभाग सहामधून ऋषीकेश रमेश माळी, अश्वीनी ठोसर. प्रभाग सातमधून ॲड. मानसी संतोष म्हात्रे, अभय म्हामुणकर. प्रभाग आठमधून ॲड. निलम किशोर हजारे, अनिल चोपडा. प्रभाग नऊमधून योजना प्रदिप पाटील, सागर शिवनाथ भगत. प्रभाग दहामधून शैला शेषनाथ भगत, वृषाली महेश भगत हे महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसचे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
पालिका स्तरावर मतदार संख्या
| नगरपरिषद | मतदान केंद्र | मतदार | स्त्री | पुरुष |
| खोपोली | 66 | 67,102 | 30,442 | 31,631 |
| अलिबाग | 19 | 16,354 | 8,207 | 8,147 |
| श्रीवर्धन | 20 | 12,637 | 6,435 | 6,202 |
| मुरूड | 17 | 11,544 | 6,104 | 5,440 |
| रोहा | 20 | 17,667 | 9,028 | 8,641 |
| महाड | 26 | 23,124 | 11,633 | 11,491 |
| पेण | 41 | 33,875 | 16,604 | 17,271 |
| उरण | 29 | 26,214 | 12,903 | 13,311 |
| कर्जत | 33 | 29,957 | 14,911 | 15,045 |
| माथेरान | 10 | 4,055 | 2,156 | 1,899 |
| एकूण | 281 | 2,42,529 | 1,18,423 | 1,19,078 |
मतदान प्रक्रीया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस अधिकारी यांना सुचना केली आहे. ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदारांना निर्भीडपणे भयमुक्त वातावरणात मतदान करता, यावा या पध्दतीने नियोजन करण्यात आले आहे. हातभर समस्यांचा बोटभर उपाय यानुसार प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावण्याचे काम करणे गरजेचे आहे.
– आंचल दलाल, पोलीस अधीक्षक, रायगड





