निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांची उपस्थिती
। अलिबाग । शहर वार्ताहर ।
भारतीय निर्वाचन आयोग अंतर्गत, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या माध्यमातून, प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबागच्या वतीने नागाव येथील प्रसिद्ध हटाळा बाजार परिसरात मतदानविषयक जनजागृती केली. या कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. भारतीय निर्वाचन आयोगामार्फत विशेष संक्षिप्त पुर्नपरीक्षण कार्यक्रम 2022 राबविण्यात येत असून, भारतीय लोकशाही अधिकाधिक निकोप बनविण्यासाठी नागरिकांचा मतदान कार्यातील सहभाग अधिक वृद्धींगत होणे अपेक्षित आहे. याच उद्देशातून विविध माध्यमांद्वारे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यानुसार, हटाळा बाजार परिसरात, प्रिझम संस्थेच्या वतीने मतदान आपली जबाबदारी या शिषकातंर्गत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. पथनाट्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिझम संस्थेच्या वतीने युवा सामाजिक कार्यकर्ते प्रतिक कोळी, प्रसाद अमृते, अमृता शेडगे, प्रांजली पाटील तथा वाद्यवादक तुषार राऊळ यांनी कलाकार म्हणून सहभाग नोंदविला. तर या कार्यक्रमास नागाव ग्रामपंचायत सरपंच निखिल मयेकर, सदस्य हर्षदा मयेकर, सदस्य राकेश मोरे, नागाव तलाठी उदय देशमुख, पोलीस पाटील संजय पाटील, कोतवाल ममतेश पाटील, युवा सामाजिक कार्यकर्ते यज्ञेश पाटील आदी मान्यवर तथा स्थानिक आणि बाजारातील ग्राहक उपस्थित होते.