। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात नऊ तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वात आहेत. त्यापैकी आतापर्यंत महाड, रोहा, खालापूर, माणगाव, पनवेल या पाच तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर पेण, कर्जत आणि मुरुड या तालुक्यातील चार समित्यांमध्ये काही जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. आता पेण, कर्जत आणि मुरुडमध्ये काही जागांसाठी 30 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
पेण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 जागासांठी सर्वाधिक 38 उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघात 11 जागांसाठी 21, ग्रामपंचायती मतदारसंघात 4 जागांसाठी 9, व्यापारी/आडते मतदारसंघात 2 जागांसाठी 6 तर हमाल/मापारी मतदार संघात एका जागेसाठी 2 उमेदवार उभे आहेत. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 जागासांठी सर्वाधिक 25 उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघात 11 जागांसाठी 16, ग्रामपंचायती मतदारसंघात 4 जागांवर बिनविरोध, व्यापारी/आडते मतदारसंघात 2 जागांसाठी 4 तर हमाल/मापारी मतदार संघात एका जागेसाठी बिनविरोध. मुरुड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 जागासांठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघात 11 जागांसाठी 13, ग्रामपंचायती मतदारसंघात 4 जागांसाठी 8, तसेच व्यापारी/आडते आणि हमाल/मापारी या दोन्ही मतदार संघात यापूर्वीच बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत.
त्यामुळे आता उर्वरित जागांसाठी लढत होणार असून महाविकास आघाडी विरोधात शिंदे आणि भाजप यांच्यात निवडणूक रंगणार आहे. पेण, कर्जत आणि मुरुडमध्ये 30 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी करण्यात येणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.