दोन वर्षाच्या बंदीची मागणी
। बीजिंग । वृत्तसंस्था ।
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला आणि सध्या फॉर्मात असलेला; परंतु उत्तेजक चाचणीत दोषी सापडलेल्या टेनिसपटू यानिस सिन्नरविरोधात जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने (वाडा) क्रीडा लवादाकडे अपिल केले आहे. वाडा आणि टेनिस उत्तेजकविरोधी नियमानुसार सिन्नरने या काळात मिळवलेली बक्षिसाची रक्कम, रँगिंक पॉइंट्स रद्द होऊ शकतात, असे आंतरराष्ट्रीय टेनिस इंटिग्रिटी एजन्सीचे म्हणणे आहे. सिन्नरवर एक किंवा दोन वर्षांची बंदी घालण्याची मागणी वाडाने केली आहे. वाडाचे हे अपिल मान्य झाले तर बंदी सिन्नर उत्तेजक चाचणीत दोषी सापडला तेव्हापासूनची नसेल. यामुळे आतापर्यंत मिळवलेले ग्रँड स्लॅम विजेतीपदे त्याच्याकडे कायम राहतील.
एकीकडे वाडा सिन्नरच्या विरोधात अपिल करत आहे आणि तो बीजिंग येथे सुरू असलेल्या चायना ओपन स्पर्धेत खेळत आहे. वास्तविक सिन्नर एकदा नव्हे तर दोनदा उत्तेजक चाचणीत दोषी सापडला होता. स्टेरॉइड त्याच्या चाचणी नमुन्यात असल्याचे सिद्ध झाले होते; परंतु, केवळ अनावधाने हे उत्तेजक आपल्या शरीरात गेले यात आपला दोष नव्हता, असे स्पष्टीकरण त्याने दिले. परिणामी, त्याला शिक्षा झालेली नाही. फिजिओथेरपिस्ट मसाज करत असताना त्याच्या हाताला लागलेले उत्तेजक आपल्या शरीरात गेले होते, असे त्याने सांगितले होते.