वाडगाव पंचायत सत्ताधाऱ्यांचे निधी लाटण्याचे कुरण

माहितीच्या अधिकारातून वाडगाव ग्रामपंचायतीचा बोगस कारभार चव्हाट्यावर;
सत्ताधाऱ्यांना वेळीच धडा शिकवा- ऋषीकांत भगत

| अलिबाग | प्रतिनिधी |

सरकार ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देते, मात्र त्याच निधीवर डल्ला मारण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जाते. याची प्रचिती तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीच्या बोगस कारभारावरुन दिसून येत आहे. ग्रामपंचायतीमध्ये खोटी बिले काढून कोट्यवधी रुपयांचा निधी घशात घालण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्यांना कदापि माफ करणार नाही. नागरिकांनी वेळीच सावधान होऊन त्यांना धडा शिकवावा, असे आवाहन वाडगावचे माजी सरपंच ऋषीकांत भगत यांनी केले आहे. ग्रामस्थ प्रविण अशोक थळे यांनी माहितीचा अधिकार वापरुन वाडगाव ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार, अनियमितता बाहेर काढला आहे. त्यांनी योग्यवेळी माहिती जनतेसमोर आणल्याने त्यांचे अभिनंदन केले पाहीजे, असे भगत म्हणाले.

विकास कामांसाठी मंजूर झालेला निधी हा जनतेपर्यंत पोचत नाही, अशी ओरड आपण सातत्याने ऐकत असतो. जनतेला विकासापासून वंचित ठेवण्याचे पाप हे व्हाईट कॉलर नेते करत असतात. जनतेच्या विकासासाठी आलेला निधी विकासकामांवरच खर्च केला, असे भासवण्याचे काम सध्या वाडगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. सत्ता हातात असली, की काळ्याचे गोरे करायला वेळ लागत नाही, असे म्हणतात. तोच प्रकार सत्ताधाऱ्यांनी केला आहे. केवळ कागदावर विकास झाल्याचे दाखवून कोट्यवधी रुपयांचा निधी गेल्या 10 वर्षात लाटला असल्याचे माहितीच्या अधिकारात प्रविण थळे यांनी उघड केले आहे, असे भगत यांनी सांगितले. एकाच कामावर चार-पाच वेळा बिले काढून निधी गिळंकृत करुन सत्ताधाऱ्यांनी साधा ढेकरही दिला नाही, असे ऋषीकांत भगत म्हणाले.

कामांचे नाव बदलून 30 लाख रुपये लाटले
वाडगाव ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी बंधारा दुरुस्त करण्यासाठी तब्बल 60 लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी काहीच काम केलेले नाही. राजिप शाळेच्या नाल्याशेजारी संरक्षक भिंत बांधण्यासाठी सात लाख रुपये खर्च केले आहेत. वाडगाव अंगणवाडी नाला संरक्षक भिंत बांधणे तीन लाख रुपये, वाडगाव ग्रामपंचायत नाला संरक्षकभिंत बांधण्यासाठी 10 लाख रुपये, वाडगाव ग्रामपंचायत नदी शेजारी संरक्षक भिंत बांधण्यासाठी 10 लाख रुपये, असे एकाच कामाचे नाव बदलून तब्बल 30 लाख रुपये कोणाच्या घशात गेले हे आता जनतेला समजले आहे, असेही ऋषीकांत भगत यांनी सांगितले.
स्मशानभूमीसाठी काढले डबल बील
स्मशानभूमीलगत नदीला संरक्षक भिंत बांधण्यासाठी सात लाख रुपये खर्च केले आहेत. हे मूळ काम माझ्या कारकीर्दीत झाले होते, पण या कामाचे डबल बिल काढण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांनी ग्रामपंचायतीला निधी लाटण्याचे कुरण बनवल्याचे ऋषीकांत भगत यांनी सांगितले. वाडगाव हनुमान मंदिराशेजारी नाल्याला संरक्षक भिंत बांधण्यासाठी एक लाख रुपये खर्च केले आहेत. गणपती घाट संरक्षक भिंत बांधण्यासाठी तीन लाख रुपये, नदीला संरक्षक भिंत बांधणे नऊ लाख रुपये, सिध्देश्वर संरक्षक भिंत बांधण्यासाठी 22 लाख रुपये खर्च केल्याचे भासवले आहे. प्रत्यक्षात कोणतेच काम झालेले नाही आणि निधी मात्र खिशात घातला आहे.
विहिरीच्या दुरस्तीसाठी 10 लाखांचा चुराडा
वाडगावमध्ये मराठा आळी आहे. या ठिकाणी काही वर्षापूर्वी ग्रामस्थांनी श्रमदानातून विहिर खोदली होती. त्यानंतर सरकारच्या निधीतून विहिर बांधण्यात आली होती. सध्या त्यातील पाण्याचा वापर केला जातो. या विहिरीची दुरुस्ती करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी 10 लाख रुपये खर्च करुन बिल लाटले आहे. खरे तर या विहिराला फक्त रंगरंगोटी केली आहे. निधी खिशात घालताना सत्ताधाऱ्यांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत, असे ग्रामस्थ सुरेश थळे यांनी सांगितले.
वस्ती नसणाऱ्या ठिकाणी पाईपलाईन टाकली
ग्रामपंचायत हद्दीतील निगडे येथे एकही घर सध्या अस्तित्वात नाही. असे असतानाही या ठिकाणी पाण्याची पाईप लाईन टाकली आहे. यासाठी पाच लाख रुपये खर्च केले आहेत. ज्याचा वापर करण्यासाठी तेथे कोणीच राहात नाही, अशा ठिकाणी जनतेच्या पैशाचा अपव्यय कशासाठी केला असा प्रश्न पडतो, मात्र या ठिकाणी पाईप टाकलेच नसल्याची माहिती पुढे आली आहे. फक्त निधी मटकावण्यासाठी कागदपत्रे रंगवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ मंगेश भगत यांनी केला
अंगणवाडी बांधली आणि दुरुस्तीसाठी एक लाख खर्च
वाडगाव ग्रापंचायतीमध्ये लहान मुलांसाठी अंगणवाडीची इमारत असावी, अशी जनतेची मागणी होती. त्यानुसार दोन वर्षापूर्वी अंगणवाडीची इमारत बांधण्यात आली. त्यानंतर एका वर्षाच्या आतच याच अंगणवाडीच्या दुरुस्ती एक लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. फक्त निधी पदरात पाडून घ्यायचा असल्यानेच अशी खोटी कामे झाली असल्याचे ग्रामस्थ प्रकाश रामचंद्र थळे यांनी म्हणणे आहे.
सरकारी निधीतून खासगी भिंतीची रंगरंगोटी
सत्ताधाऱ्यांनी हुनमान मंदिराशेजारी विकासकाम करताना कमालच केली आहे. या ठिकाणी सरकारी निधीच्या माध्यमातून त्यांनी चक्क खासगी मालकीच्या जागेतील संरक्षक भिंतीची रंगरंगोटी केली आहे. तसेच सुशोभिकरण केल्याचे भासवून 10 लाख रुपये फस्त केले आहेत, सत्ताधारी हे पाप कोठे फेडतील असा संताप ग्रामस्थ रविंद्र बाळाराम गीजे यांनी व्यक्त केला.
3 मीटरच्या रस्त्यासाठी तीन लाख खर्च
गावातील भगत कुटुंबाच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावर पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम मंजूर झाले होते. या ठिकाणी 600 मीटर पैकी फक्त तीन मीटर अंतरावरच पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहेत. तीन मीटर लांबीच्या पेव्हर ब्लॉकसाठी दोन लाख 98 हजार रुपये खर्च केले आहेत. ही जनतेची फसवणूक असल्याचे ग्रामस्थ प्रसाद गौरु पाटील यांनी सांगितले.
14 व्या वित्त आयोगातील कामात अनियमितता
गावात 14 व्या वित्त आयोगातून लाखो रुपयांच्या निधीची कामे मंजूर झाली. त्या कामांमध्ये अनियमितता झाली असल्याचा शेरा लेखा परीक्षकांनी मारला आहे. त्यामुळे विकास कामावर एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे येथील ग्रामस्थ प्रभाकर काशीनाथ भगत यांनी स्पष्ट केले. या विकास कामांमध्ये प्रामुख्याने मराठी शाळेला संरक्षक भिंत बांधणे दोन लाख रुपये, अंगणवाडी रंगरंगोटीसाठी एक लाख रुपये, औषध फवारणी 70 हजार रुपये, पाण्याच्या टाकीला संरक्षक भिंत बांधण्यासाठी चार लाख 94 हजार रुपये खर्च केले आहेत.
 आदिवासीवाडी येथील बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामावर एक लाख रुपये, तसेच कोरोना कालावधीत मास्क, सॅनिटायझर वाटपासाठी दोन लाख 30 हजार रुपये, स्ट्रीट लाईट, एलइडी बल्बसाठी दोन लाख 99 हजार रुपये खर्च केल्याचे दाखवले आहे. मात्र ही कामे बोगस असल्याचे ऋषीकांत भगत यांनी स्पष्ट केले.
साड्या वाटल्या ग्रामस्थांच्या पैशातून
साडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला होता. त्यावेळी सांगण्यात, आले होते की आम्ही स्वखर्चाने साड्या वाटल्या आहेत, मात्र प्रत्यक्षात मिळालेल्या माहिती नुसार सुमारे 80 हजार रुपयांचे बिल सत्ताधाऱ्यांनी वसूल केले आहेत. सर्व कोणाच्या जिवावर केले असा संतप्त सवाल ग्रामस्थ कोमल मनोज म्हात्रे यांनी केला आहे.

2013 पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. त्याच विकासकामांचा आसरा आताच्या सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. आम्ही केलेल्या काही विकास कामांची खोटी बिले सत्ताधाऱ्यांनी काढून आतापर्यंत कोट्यवधी रुपये लाटले आहेत. शेकापचे आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, काँग्रेसचे माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांच्या आशिर्वादाने वाडगावचा कायापालट आम्ही केला होता. याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे. परंतु जनता सुज्ञ आहे. सत्ताधाऱ्यांना सत्तेवरुन खाली खेचल्या शिवाय राहणार नाही, असे ऋषीकांत भगत यांनी सांगितले.

Exit mobile version