। पेण । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण तथा तिसर्या मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून पेणकडे पाहिले जात आहे. परंतु, दिवसेंदिवस पेणमध्ये शहरीकरण वाढत असल्याने नकळत इतर अवैध बाबी ही वाढत आहेत. त्यामुळे शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा कर्मचार्यांचे (मनुष्यबळ) अभावे अपुरी पडत आहे. त्यासाठी पेण शहरात जिल्हा नियोजन म्हणून सीसीटीव्ही कॅमेर्यांची तरतुद करून ठेवली आहे. त्याची निविदा निघून कार्यादेश (वर्कऑर्डर) ही ठेकेदाराला दिली आहे. या गोष्टीला जवळपास 6 महिने उलटून गेले, मात्र आजतागायत सीसीटीव्ही कॅमेर्यांची काम सुरू नाहीत.
पेण शहरात वाढत असणार्या चोर्यांमुळे सीसीटीव्ही कॅमेरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पेणच्या शेजारी असलेल्या अलिबाग शहरामध्ये तेथील नगरपालिकेने पुर्ण शहर सीसीटीव्ही कॅमेराच्या एका नजरेत आणला आहे. मात्र, पेण शहरामध्ये असे होत नाही. त्यातच गेली दोन ते तीन वर्ष पेण शहरात प्रशासक असल्याने ठेकेदारांवर वचक ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी काहीही करू शकत नाहीत. तर, दुसरीकडे प्रशासकाला ठेकेदाराला जुमानत नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
मनुष्यबळाच्या अभावी सगळीकडे लक्ष ठेवणे पोलिसांना शक्य होत नाही. त्यामुळे पोलीसांचा तिसरा डोळा म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे असणे गरजेचे आहे. जेणेकरून पेण शहरात कायदा व सुव्यवस्था अबादित ठेवण्यात पोलिसांना मदत होईल. या बाबत पोलीस निरिक्षक संदीप बागूल यांच्याशी संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, 145 सीसीटीव्ही कॅमेरे नगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणार होते. मात्र आम्ही सर्व शहराचा सर्वेक्षण करून 158 कॅमेर्यांची गरज असल्याचे कळविले आहे. एवढयाला काम पुर्ण होणे गरजेचे होते. पण काम का थांबले आहे याबाबत आमचे कर्मचारी नगरपालिकेशी संपर्क करून विचारणा करत आहेत. वारंवार नगरपालिकेकडून लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, असे आश्वासन दिले जात आहे.
मुख्याधिकारी यांचे पुन्हा आश्वासन
कृषीवलच्या प्रतिनिधींनी पेण नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी जिवन पाटील यांच्याशी संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही कामाची वर्क ऑर्डर दिलेली आहे. बेसिक ठेकेदाराने कामदेखील सुरू केले आहे. मात्र, मध्येच काम का थांबले आहे, य बाबत ठेकेदाराशी विचारणा करून त्याला तातडीने काम सुरू करण्यास सांगून युध्दपातळीवर पेण शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेण्यात येतील. असे 26 ऑक्टोंबर रोजी सांगण्यात आले होते. तसेच, पुन्हा 27 डिसेंबर रोजी सांगण्यात आले आहे.
