कर्जतला शासकीय हेलिपॅडची प्रतीक्षा

जागेचे हस्तांतरण होऊन देखील कार्यवाही शून्य
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यासाठी आपत्तीच्या काळात हवाई मदत द्यायची झाल्यास शासनाचे स्वतःचे असे कुठेही हेलिपॅड नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मागणीनंतर कडाव ग्रामपंचायतीने दोन एकर जमीन हेलिपॅड उभारण्यासाठी प्राधिकरणाला दिली. त्या जमिनीचे ग्रामपंचायतकडून हस्तांतरण होऊन देखील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून हेलिपॅड उभारण्याच्या कोणत्याच हालचाली केल्या नसल्याने शासकीय हेलिपॅडची प्रतीक्षा कायम आहे.

कर्जत तालुक्यात मंत्री किंवा मान्यवरांचा दौरा जाहीर झाल्यावर किंवा एखादी आपत्ती आल्यावर शासकीय यंत्रणांची हेलिपॅड उभारण्याची धावपळ सुरु होते. अशावेळी बांधकाम विभागावर तात्पुरते हेलिपॅड बनविण्यासाठी जागा आणि नियोजन करावे लागते. शासकीय हेलिपॅड नसल्याने खासगी हेलिपॅडवर मदार ठेवावी लागते. यामुळे 2016 मध्ये कर्जत तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी शासकीय हेलिपॅड उभारण्याची मागणी समोर आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने हेलिपॅड उभारण्याचे प्रयत्न सुरु केले.

जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार कडाव ग्रामपंचायतीने सर्वे नंबर 13 /1/अ या जमिनीतील दोन एकर जमीन शासकीय हेलिपॅड उभारण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. 2020 मध्ये कडाव ग्रामपंचायतने सदर जमिनीचा ताबा जिल्हा प्रशासनाला दिला. 2021 मध्ये प्राधिकरणाच्या नावाचा सातबारा तयार झाला आहे. मात्र तेथे हेलिपॅड उभारण्याची कोणतीही हालचाल प्रशासनाने केलेली नाही.

मध्यवर्ती ठिकाण
कडाव ग्रामपंचायतीमध्ये शासकीय हेलिपॅड बनविण्यासाठी दिलेली जमीन तालुक्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्या ठिकाणावरून कर्जत हे तालुक्याचे ठिकाण नऊ किलोमीटर अंतरावर आहे. तर भिवपुरी रोड रेल्वे स्थानक चार किलोमीटर आणि नेरळ स्टेशन 11 किलोमीटर अंतरावर आहे.तर प्रस्तावित हेलिपॅड येथून माथेरान पर्यटन स्थळ 20 किलोमीटर अंतरावर आहे.हेलिपॅडपासून 100 मीटर अंतरावर शहापुर- मुरबाड-कर्जत-वाकण हा राष्ट्रीय महामार्ग आहे.

पूर्वीचे नियोजन
कर्जत तालुक्यात शासकीय कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल आणि अन्य महत्वाच्या व्यक्ती येत असतात. त्यांच्यासाठी शासकीय हेलिपॅड उपलब्ध नसल्याने खासगी हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरविले जाते.त्यात टाटा कंपनीचे भिवपुरी येथील आणि कर्जत- चौक रस्त्यावर एनडी स्टुडिओ येथील हेलिपॅडचा वापर केला जात आहे. नेरळ येथील कोतवालवाडी आणि कर्जत मार्केट यार्ड येथे देखील हेलिकॉप्टर उतरविण्याची व्यवस्था गरजेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येते.
फोटो नेरळ

Exit mobile version