काशिद-मुंबई रो-रो सेवेची प्रतीक्षा लांबणीवर

| अलिबाग | प्रमोद जाधव |

पर्यटकांचा जलवाहतूकीचा प्रवास अगदी कमी वेळेत व्हावा, यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत मुंबई ते काशिद रो-रो सेवा सूरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षापासून काशीद येथे प्रवासी जेट्टीसह विविध कामे सूरू आहेत. मात्र, ही कामे कुर्मगतीने सुरू असलेल्यामुळे काशीद-मुंबई रो-रो सेवेची प्रतिक्षा लांबणीवर जाऊ लागली आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे काम संथ गतीने सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

जिल्ह्यातील काशीद हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी कायमच आकर्षक ठरला आहे. जगाच्या नकाशात काशीद समुद्र किनाऱ्याला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. वर्षाला दोन लाखहून अधिक पर्यटक काशीमध्ये फिरण्यासाठी येतात. काशीद समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद पर्यटक मनमुरादपणे लुटतात. मुंबई, पुणे, सातारा, ठाणे या जिल्ह्यांसह अन्य जिल्हे, राज्य, देश विदेशातील पर्यटक काशीद समुद्रकिनाऱ्याला पसंती दर्शवितात.

काशीद समुद्रकिनाऱ्याचे आकर्षण पर्यटकांना कायमच आहे. त्यामुळे काशीद समुद्रकिनारी फिरण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात. शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी तसेच अन्य सुट्टीच्या दिवशी काशीद समुद्रकिनारी पर्यटकांची अलोट गर्दी असते. पर्यटन वाढीमुळे स्थानिकांना रोजगाराचे साधन खुले होत आहे. खाद्य पदार्थांसह वेगवेगळया वस्तू विक्रीची दुकानेदेखील या परिसरात असल्याने खरेदीलादेखील प्रचंड गर्दी होते. यातून उत्पन्नाचे साधन स्थानिकांना मिळत आहे.
मुंबई येथून मांडवा त्यानंतर मांडव्यावरून वाहनाने अलिबाग मार्गे काशिदला पोहचतात. त्यामुळे पर्यटकांना अलिबागहून काशीदला जाण्यासाठी तीन तास अधिक मोजावे लागतात. प्रवासात वेळ जात असल्याने पर्यटकांना किनारी फिरण्याचा आनंद घेण्यास जास्त वेळ मिळत नाही.

पर्यटकांचा हा त्रास कमी करण्यासाठी मुंबई ते काशीद रो-रो सेवा सुरू केल्या जाणार आहेत. मांडवा ते भाऊचा धक्का (मुंबई) या यशस्वी प्रकल्पानंतर केंद्र शासनाने सागर माला योजनेअंतर्गत मुंबई ते काशीद रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये या कामाची हालचाल सुरू झाली.गेल्या पाच वर्षापासून काशीद समुद्रकिनारी या प्रकल्पाचे काम सुरु आहे.

समुद्राच्या लाटा थांबविण्यापासाठी ब्रेक वॉटर बंधाऱ्यासह रो-रो जेट्टी, प्रवासी जेटी, टर्मिनल निर्माण करण्याचे काम सूरू आहे. 112 कोटी रुपयांचे हे प्रकल्प असून 99.96 कोटी रुपये खर्च झाले आहेत. प्रकल्पाचे काम आतापर्यंत 92 टक्के पुर्ण झाले आहे. मात्र ठेकेदाराकडून काम संथ गतीने होत असल्याचा फटका पर्यटकांसह स्थानिकांना बसत आहे. मुंबई ते काशीद रो- रो सेवा कधी सुरू होणार याची प्रतिक्षा पर्यटकांना लागून राहील आहे. मुंबईहून काशीदला जलवाहतूकीने अवघ्या दोन तासात पोहचता येणार आहे. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून केली जात आहे.

चाकरमान्यांसाठी ठरणार फायदेशीर
आगरदांड्यापासून दिघी मुरुड, काशीद, उसरोली, मजगाव अशा अनेक भागातील नागरिक मुंबईला नोकरी व्यवसायानिमित्त जातात. सुट्टी व सणांच्या काळात सुट्टी घेऊन गावी येतात. परंतु मुंबईहून येताना त्यांना सतत वाहने बदलावी लागतात. त्यामुळे प्रवास करताना त्यांचा वेळ प्रचंड जातो. त्यामुळे चाकरमान्यांसाठी हा प्रवास फायदेशीर ठरणार असल्याची प्रतिक्रीया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
ठेकेदारावर दंडात्मक कारवाई
काशीद येथे सागरमाला योजनेअंतर्गत 112 कोटी रुपयांच्या रो - रो प्रकल्पाचे काम सूरू आहे. ठेकेदाराकडून संथगतीने काम केले जात आहे. त्यामुळे या ठेकेदाराविरोधात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने दंडात्मक कारवाई कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे.
Exit mobile version