उरणमध्ये आनंदाच्या शिध्याची प्रतिक्षा

आदिवासी-गोर गरीब लाभापासून वंचित; वाटप लवकर करण्याची मागणी

| उरण । वार्ताहर ।

गोरं गरीबांना रास्त भाव दुकानातून आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र उरण तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांपर्यंत शिधा पोहचला नाही, अशी माहिती आदिवासी बांधव व इतर गोरं गरीब लाभार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. तरी पुरवठा अधिकारी वर्गाने सदर घटनेचे गांभीर्य ओळखून गोरं गरीबांना आनंदाचा शिधा कशा प्रकारे पोहोचेल यासाठी जातीने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी चक्क लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

दिपावली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोरं गरीबांना रास्त भाव दुकानातून आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण उरण तालुक्यातील लाभार्थ्यांपर्यंत शिधा पोहोचतच नाही. तालुक्यात एकूण 26 हजार 577 लाभार्थी आहेत. परंतु दिपावली सारख्या सणातही या लाभार्थ्यांपैकी अनेक आदिवासी बांधवांबरोबर इतर गोर गरीब लाभार्थ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारा आनंदाचा शिधा मिळाला नाही.

शुक्रवारी (दि.14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोरं गरीब लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला. मात्र आनंदाच्या शिधामधिल धान्य गोरं गरीबांच्या झोपडीत पोहोचले नाही. त्यामुळे रास्त दुकानातून वाटप करण्यात येणारा आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना केव्हा मिळणार, असा प्रश्‍न उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांबरोबर इतर गोर गरीब लाभार्थ्यीं हे राज्य सरकारला विचारत आहेत.

उरण तालुक्यातील रास्त भाव दुकानातून आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या दोन चार दिवसात सर्व लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप होणार आहे. आणि तशा प्रकारचे आदेश सर्व रास्त भाव दुकानदारांना देण्यात आले आहेत.

कविता रोकडे, पुरवठा अधिकारी, उरण तहसील कार्यालय
Exit mobile version