। पाली-बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील पाली हे अष्टविनायक देवस्थानापैकी प्रख्यात धार्मीक स्थळ आहे. तसेच पाली हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने पालीत नेहमीच नागरीक व भाविकांची मोठी रेलचेल सुरु असते. उन्हाळी सुट्ट्यात तर वाहतुक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाल्याचे दिसून आले. सण व उत्सवात देखील हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने पालीत दाखल होताना दिसतात. त्यामुळे येथे वारंवार वाहतुक कोंडी होत असुन भाविक, पादचारी व विदयार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पालीच्या बाहेरुन बलाप गावापासून पर्यायी (बायपास) मार्गाला मंजुरी असुनही हा बायपास मार्ग लालफितीत अडकला आहे. खाजगी, अवजड व लक्झरी वाहनांची ये-जा, नियमांचे उल्लंघन करणारे चालक, अरूंद रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने व बांधकामे यामुळे पालीत सतत वाहतूक कोंडी असते. सुट्ट्यांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीत दाखल होत आहेत. या वाहनांमुळे पालीतील वाहतुकीवर प्रचंड ताण येऊन वारंवार अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी होत आहे. परिणामी पालीत प्रचंड वाहुक कोंडी होते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी बायपास काढण्याची मागणी येथील नागरिक जनतेतून वारंवार होत आहे. बलाप गावावरुन थेट बल्लाळेश्वर मंदिराजवळ मार्ग काढण्याचा पर्याय आहे. त्यासाठी शासनाची मंजुरी देखिल मिळाली आहे. परंतू हा पर्यायी मार्ग लालफितीत अडिकला आहे.
- पालीत वारंवार होणार्या वाहतुक कोंडीमुळे सर्वांचीच मोठी गैरसोय होते. लवकरात लवकर पर्यायी बाह्यवळण रस्ता तयार करण्यात यावा. त्यामुळे पालीतील अरुंद रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होउन वहातुक कोंडीची समस्या मार्गी लागेल. – हरीचंद्र शिंदे, अध्यक्ष रायगड जिल्हा शेतकरी संघटना, पाली सुधागड