एसटीचे हायटेक कामकाज फक्त कागदावरच
| रायगड | प्रमोद जाधव |
एसटी महामंडळाने हायटेक होत कागदी पासच्या जागी स्मार्ट कार्डची योजना राज्यात राबविली. मात्र, नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे महामंडळाचा कारभार चालला असल्याचे दिसून आले आहे. मागील तीन वर्षापासून ही योजना बंद पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नियमीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्मार्टकार्डची प्रतिक्षा कायमच असून, एसटीचे पासचे कामकाज कागदाच्या भरोवश्यावरच चालत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून प्रवास करताना, तहसील कार्यालयातील मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दाखल्याच्या आधारे एसटीची सवलत पुर्वी मिळत होती. त्यानंतर आधारकार्डमार्फत सवलत देण्यास सुरुवात केली. मात्र, हे कार्ड हाताळताना गहाळ होण्याची भिती अधिक होती. त्यात खराब होण्याची शक्यताही होती. एसटी महामंडळाने 65 वर्षे पुर्ण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र म्हणून स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेतला. बस आगारातील आरक्षण कक्षामध्ये त्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरु करण्यात आले. स्मार्टकार्ड नोंदणी केल्यानंतर एक ते दोन महिन्यानंतर स्मार्टकार्ड देण्याची व्यवस्था करण्यात आली. एसटी महामंडळाच्या या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. एसटीचे स्मार्टकार्ड दाखवून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली. तसेच एसटीतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह अन्य पासधारक प्रवाशांनादेखील स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात केली. कागदी पासच्या जागी स्मार्टकार्ड आल्याने विद्यार्थी व अन्य प्रवासीदेखील आनंदी झाले. आठ वर्षापुर्वी सुरु झालेली स्मार्टकार्ड योजना गेल्या तीन वर्षापासून बंद पडली आहे. ज्या कंपनीला स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम दिले होते. त्याच कंपनीच्या तांत्रिक कामांमध्ये बिघाड झाला. सर्व्हरची समस्या निर्माण झाली. त्यामुळे नव्याने स्मार्टकार्ड काढण्यास अडचण निर्माण झाली. मुदत संपलेल्या कार्डचे नुतनीकरणही करणे ही थांबले. 2016 पासून स्मार्ट कार्ड योजना सुरु केली. एटीएम कार्डसारखे अद्ययावयत असे स्मार्टकार्ड हेच विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व अन्य पासधारकांसाठी एसटी बस पासमधील ओळखपत्र बनले होते ते ओळखपत्र स्कॅन केल्यावर नोंदणी मशीनमध्ये केली जात होती. मात्र स्मार्ट कार्ड मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे सध्या आधारकार्ड व कागदी पासच्या भरोवश्यावरच विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.
स्मार्ट कार्ड योजना केंद्र सरकारकडून सूरू करण्यात आली होती. काही कारणास्तव कार्ड देणे थांबले होते. परंतु लवकरच पुन्हा स्मार्टकार्ड देण्यात येतील.
-सुनील चौरे
विभाग नियंत्रक
एसटी महामंडळ, रायगड विभाग
