| पाली/गोमाशी | वार्ताहर |
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे बहुतांश काम मार्गी लागले आहे. मात्र, नवीन डांबरी व सिमेंटच्या रस्त्याला दोन्ही बाजूने पांढरे पट्टे तसेच रिफ्लेक्टर नसल्याने हा रस्ता असुरक्षित झाला आहे.
पावसामुळे रस्ता ओला झाल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे नसल्याने या मार्गावर काही छोटे-मोठे अपघातसुद्धा झाले आहेत. तसेच मार्ग रुंदीकरणादरम्यान काही ठिकाणी रस्त्यावर असुरक्षित व धोकादायक खोदकाम केले आहे. काही कंपन्यांचे याठिकाणी येणारे मोठे टँकर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळादेखील होतो. या समस्यांमुळेदेखील येथून प्रवास करणे असुरक्षित झाले आहे.
महत्त्वाचा मार्ग
हा महामार्ग मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने जाणारे प्रवासी, वाहने व मालवाहू वाहने याच मार्गावरून जातात. अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली येथेदेखील शेकडो भाविक या मार्गाने येतात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतूक होते. परिणामी, रिफ्लेक्टर व पांढर्या पट्ट्यांअभावी रात्रीच्यावेळी वाहने चालविताना वाहनचालकांची गैरसोय होत आहे.
नवीन डांबरी व सिमेंटच्या रस्त्याला दोन्ही बाजूने पांढरे पट्टे तसेच वळणावर रिफ्लेक्टर नसल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. शिवाय, वाहतूकदेखील मंदावते. त्यामुळे या मार्गावर रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे बसविण्यात यावेत.
संजोग शेठ, शेकाप शहर सहचिटणीस, पाली
या मार्गावरील कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच सर्व कामे पूर्ण करणार आहोत.
सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी